रूपाली चाकणकर, अनिल देशमुख यांनी फिर्याद मागे घ्यायला लावली, अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:15 IST2025-05-29T15:15:18+5:302025-05-29T15:15:53+5:30
‘बलात्काराच्या घटना घडतच असतात, दुसरे लग्न करून मोकळे व्हायचे, असा अजब सल्ला दिल्याचा आरोप

रूपाली चाकणकर, अनिल देशमुख यांनी फिर्याद मागे घ्यायला लावली, अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप
सांगली : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, रूपाली चाकणकर यांनी दबाव आणून फिर्याद मागे घ्यायला लावली. त्यानंतर पुन्हा सामूहिक अत्याचार झाला. माझ्या शरीराचे किती लचके तोडले जाणार? असा सवाल पीडित तरुणीने सांगलीत पत्रकार बैठकीत बुधवारी केला. दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्याकडे न्यायाची मागणी केल्यानंतर त्यांनी ‘बलात्काराच्या घटना घडतच असतात, दुसरे लग्न करून मोकळे व्हायचे, असा अजब सल्ला दिल्याचा आरोपही पीडितेने केला.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत ही पत्रकार बैठक झाली. पीडित तरुणी म्हणाली, २०२० मध्ये कडेगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मार्गदर्शनाच्या निमित्ताने घरी नेऊन अत्याचार केला. या प्रकरणात राज्यभर आंदोलन सुरू झाले.
तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस अधिकाऱ्याला वाचवण्याची विनंती करून पुनर्वसनाची हमी दिली. मी नकार दिल्यानंतर मला त्यांच्या पीएमार्फत दीड कोटींची ऑफर दिली गेली. त्यानंतर तत्कालीन उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगलीत हॉटेलमध्ये चार दिवस नजरकैदेत ठेवले. त्यानंतर सतत दबाव टाकून गुन्हा मागे घ्यायला लावला.
पीडिता म्हणाली, पोलिस अधिकारी हसबनीस याने अत्याचारानंतर पुन्हा मला त्रास देण्यास सुरुवात केली. माझ्यावर पुन्हा सामूहिक अत्याचार झाला. तत्कालीन पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी माझी तक्रार ऐकून घेत गुन्हा नोंदविला. मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे हसबनीस आणि त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मागे घ्यायला लावलेली केस पुन्हा ओपन करावी. माझ्यावरील अत्याचाराचे, दबावाचे पुरावे घेऊन मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे.
या आरोपात काहीही तथ्य नाही. संबंधित महिला २०२० रोजी बलात्कार झाल्याचे सांगत असेल तर त्यावेळी मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नव्हते. माझी महिला आयोगाची नियुक्ती २० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली आहे. - रुपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग