कर्नाटकातील हिप्परगीचे दरवाजे बंद ठेवल्यास राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली; कृष्णेचा फुगवटा वाढण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:44 IST2024-07-02T13:44:27+5:302024-07-02T13:44:53+5:30
महापूर नियंत्रण समितीची भूमिका

कर्नाटकातील हिप्परगीचे दरवाजे बंद ठेवल्यास राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली; कृष्णेचा फुगवटा वाढण्याचा धोका
सांगली : कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्याने राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली गेल्याचा दावा कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला आहे. कृष्णा नदीतील पाण्याचा फुगवटा रोखण्यासाठी हिप्परगीचे दरवाजे ३१ ऑगस्टपर्यंत उघडेच ठेवण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग व कर्नाटक सरकारला पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, सांगली, कोल्हापूरचा संभाव्य महापूर रोखण्यासाठी पावसाळ्यात कृष्णा नदी अखंड प्रवाहित राहणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ७ जूनरोजी महापूर नियंत्रण समितीची बैठक झाली होती. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी हिप्परगी धरणारे दरवाजे ३१ ऑगस्टपर्यंत खुले ठेवून संपूर्ण विसर्ग पुढे सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यासंदर्भात पाटबंधारे विभाग पुढील आवश्यक कार्यवाही करेल असेही ठरले होते.
मात्र आजमितीस धरणाचे २२ पैकी १६ दरवाजे बंद आहेत. धरणात २१००० क्युसेक क्षमतेने पाणी जमा होत आहे. उघडलेल्या सहा दरवाजांतून १२००० क्युसेक विसर्ग होत आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी ५२२.६० मीटर आहे. धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे राजापूर व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधाराही पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली आहे. पाटबंधारे खात्याच्या अकार्यक्षम कारभारामुळे ३० जूनरोजीच ही स्थिती उद्भवली आहे.
अलमट्टी ५१७ खालीच ठेवा
हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी हिप्परगी धरणाचे दरवाजे खुले करण्यासाठी कार्यवाही करावी. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेने होऊ शकेल. अलमट्टीची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरपेक्षा कमी राहील याची दक्षता घ्यावी.