जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी उंबरठे झिजविले त्याचा मी साक्षीदार, माजी खासदार संजय पाटील यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:08 IST2026-03-21T16:08:25+5:302026-03-21T16:08:57+5:30
आयुष्यभर विश्वासघातकी राजकारण केले

जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी उंबरठे झिजविले त्याचा मी साक्षीदार, माजी खासदार संजय पाटील यांचा गौप्यस्फोट
सांगली : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आयुष्यभर जिल्ह्यात विश्वासघातकी राजकारण केले. त्यांचा सगळा काळा इतिहास मी पाहिला आहे. तसेच भाजप प्रवेशासाठी त्यांनी किती उंबरठे झिजविले याचाही मी साक्षीदार, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते व माजी खासदार संजय पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर जयंत पाटील म्हणाले होते की, संजय पाटील यांना आम्हीच महायुतीकडे माहिती काढण्यासाठी पाठविले होते. याबाबत संजय पाटील यांनी स्पष्टीकरण देताना जयंत पाटील यांच्यावर टीका केली.
संजय पाटील म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी अतिशय कुजकट आणि दुसऱ्याचे राजकारण अडचणीत यावे अशी वक्तव्य केली आहेत. त्यांचा काळा इतिहास मला माहिती आहे. तो काढायला वेळ लागणार नाही. मी त्यांना कधी नेता मानलं नाही. त्यांनी बालिश वक्तव्य केलं, अशा पद्धतीने तुम्ही कुणाशीही राजकारण करू नका. त्यांच्या काही गोष्टी काढायला लागलो तर त्यांना ते खूप कठीण जाईल. राजकीय साटेलोटे करण्यासाठी त्यांनी काय केले हे आम्हाला माहीत आहे. विश्वासघाताचे राजकारण केले ते काढायला लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा शब्द फिरवला
संजय पाटील म्हणाले, मी संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभेत पराभव झाला, विधानसभेत पराभव झाला; पण राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मी कुणाचे उंबरठे झिजवले नाहीत. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली म्हणून आम्हाला अध्यक्षपद द्या, अशी मागणी मी केली होती. आदल्या दिवशी त्यांनी सांगितले की, अध्यक्षपद देता येत नाही. आमची बैठक झाली; पण त्या ठिकाणी काही घडामोडी समजल्यानंतर मी ठरवलं अशा विश्वासघातकी माणसांसोबत राहण्यापेक्षा बाहेर पडलेले बरे. त्यामुळे मी बाजूला झालो.