मी राज्यातील सिनिअर मंत्री, ‘गृहमंत्री’पद फक्त राहिलंय - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:43 IST2025-04-22T11:42:19+5:302025-04-22T11:43:34+5:30
तासगावातील दुर्गामाता मंदिर शक्तिस्थळ ठरेल

मी राज्यातील सिनिअर मंत्री, ‘गृहमंत्री’पद फक्त राहिलंय - चंद्रकांत पाटील
तासगाव : मी राज्यातील सिनिअर मंत्री आहे. जवळपास सर्व मंत्रिपदे मी भूषवली आहेत. ‘गृहमंत्री’पद फक्त राहिले आहे, असे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवाय शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने उभारलेले दुर्गामाता मंदिर सर्वांसाठी शक्तिस्थळ ठरेल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने सुमारे ४ कोटी ६५ लाख रुपये खर्चून भव्य असे दुर्गामाता मंदिर उभारले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम सुरू आहे. त्यानिमित्ताने आज महाआरतीचे आयोजन पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. महाआरतीनंतर मंत्री पाटील बोलत होते.
ते म्हणाले, शिवनेरी मंडळाचे काम स्फूर्तिदायी आहे. सध्या तरुण मंडळे अनेक जयंती उत्सव साजरी करतात. वर्गणी गोळा करतात. मात्र जमा झालेल्या पैशांचा विनियोग डॉल्बी किंवा अन्य अनावश्यक गोष्टींवर होतो. मात्र शिवनेरी मंडळाने समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. या मंडळाचे दहीहंडीमधील सातत्य व त्यातून उभारलेल्या निधीतून दुर्गामातेचे मंदिर उभारणे, हा खरोखर स्फूर्तिदायी उपक्रम आहे.