पावसाची उसंत, सांगलीत शेकडो घरे अजूनही पाण्याखाली; महापालिकेकडून स्वच्छता मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:34 IST2025-09-29T16:33:21+5:302025-09-29T16:34:29+5:30
पावसाने सांगलीकरांची उडाली होती दैना

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : शहरात रविवारी पावसाने उसंत घेतली असली तरी अजूनही अनेक भागांत पाणी साचून आहे. कुपवाड फाटा, शामरावनगर परिसरातील अनेक घरे पाण्याखाली आहेत. काही बंगल्यांना गटारीच्या सांडपाण्याने वेढा दिला आहे. रस्तेही पाण्याखाली आहेत. महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी जेसीबी, जेट मशीन यंत्रणा कार्यरत होती.
शनिवारी शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरातील नाले, गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. शामरावनगर, जुना बुधगाव रस्ता, कुपवाड फाटा, भीमनगर, शिंदे मळा, विजयनगर परिसरातील अनेक घरे पाण्याखाली गेली होती. स्टेशन चौक, छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, झुलेलाल चौक, मीरा हौसिंग सोसायटी या परिसरांत पाणी साचून होते. शामरावनगरमधील बहुतांश सर्व काॅलन्यांत पाणी शिरले होते. पावसाने सांगलीकरांची दैना उडाली होती.
शनिवारी सायंकाळपासून पावसाने उसंत घेतली. रविवारही दिवसभर उघडीप होती. जुने बुधगावसह अनेक भागांतील पाणी ओसरले. भीमनगरमध्ये पहाटेच्या वेळी पाण्याचा निचरा झाला. कुपवाड फाटा येथील स्नेहदर्पण काॅलनीत मात्र पाणी थांबून होते. तेथील घरे, बंगले अजूनही पाण्याखाली होते. शामरावनगरमध्येही काही घरांत पाणी साचलेले होते. रस्ते पाण्याखाली होते. काही बंगल्यांसमोर गटारीतील पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली होती.
महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा रस्त्यावर उतरविली होती. जेसीबीच्या साहाय्याने चरी मारण्यात आल्या. जेट मशीनद्वारे गटारींची स्वच्छता करण्यात आली. पाणी ओसरलेल्या भागात औषध फवारणी व स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते.