तासगावात नवीन हिरवा बेदाण्यास २५५ रुपये उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:26+5:302021-02-14T04:25:26+5:30
बाजार समिती आवारातील बाजारपेठेतील १५ बेदाणा अडत दुकानातील बेदाणा सौदे शनिवारी येथील बेदाणा सेल हॉलमध्ये झाले. यावेळी भूपाल पाटील ...

तासगावात नवीन हिरवा बेदाण्यास २५५ रुपये उच्चांकी दर
बाजार समिती आवारातील बाजारपेठेतील १५ बेदाणा अडत दुकानातील बेदाणा सौदे शनिवारी येथील बेदाणा सेल हॉलमध्ये झाले. यावेळी भूपाल पाटील यांच्या मे. धारेश्वर ट्रेडिंग कंपनी या दुकानात राजाराम दादू महाजन (रा. वाळवा) यांनी २३ बॉक्स ३४५ किलो, यावर्षीचा नवीन बेदाणा विक्रीसाठी ठेवला होता. या बेदाण्यास २५५ रुपये दर मिळाला. हा दर यावर्षीचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. हा बेदाणा राजयोग औव्हरसिजचे योगेश कबाडे यांनी खरेदी केला. या दुकानातून सुमारे साडेआठ टन नवीन बेदाण्याची विक्री झाली, त्यास १८५ ते २५५ रुपये दर मिळाला.
सौद्यात २६ हजार ८२० बॉक्स, ४०० टन ४० गाडी आवक होऊन प्रत्यक्ष १६ हजार ७३० बॉक्स, २५० टन २५ गाडी विक्री झाली. हिरवा बेदाण्यास १०५ ते २५५, पिवळा बेदाण्यास १०० ते १६० व काळा बेदाण्यास ३५ ते ७० रुपये दर मिळाला. तासगावात बेदाण्यास चांगले दर मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी बाजार समितीचे सभापती अजित जाधव, उपसभापती धनाजी पाटील, संचालक रवींद्र पाटील, कुमार शेटे, लक्ष्मण पाटील, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी तसेच मनोज मालू, अशोकशेठ बाफना, सुभाष हिंगमिरे, राहुल बाफना, संजय बोथरा, यांच्यासह खरेदीदार व्यापारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
चाैकट
तासगावात बेदाणा विक्रीसाठी आणावा -अजित जाधव
तासगाव बाजार समितीने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पावले टाकली आहेत. सध्या बेदाण्यास अपेक्षित उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगाव बेदाणा बाजारपेठेत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती अजित जाधव व सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
फोटो : १३ तासगाव १