सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर, घरावर झाड कोसळले, पत्रे उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:51 IST2026-03-27T12:50:46+5:302026-03-27T12:51:05+5:30

वादळी पावसाचा मिरज, पलूस तालुक्यांना तडाखा

Heavy unseasonal rain accompanied by stormy winds lashes the Miraj and Palus talukas of Sangli district | सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर, घरावर झाड कोसळले, पत्रे उडाले

सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर, घरावर झाड कोसळले, पत्रे उडाले

सांगली : मिरज आणि पलूस तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने बुधवारी आणि गुरुवारी जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. मिरजच्या पूर्व भागात बुधवारी रात्री वादळामुळे घरांची छते उडाली आणि झाडे कोसळून सुमारे २० वीज खांब पडल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. ईदगाह परिसरात घरावर झाड कोसळल्याची घटना घडली. गुरुवारी पलूस तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्षबागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.

गुरुवारी दुपारी पलूस तालुक्यात गारांसह पाऊस पडल्यामुळे द्राक्षबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. अवघ्या २५ मिनिटांच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांवर पाणी फिरले. गहू, हरभरा, शाळू आदी पिकांसह द्राक्षबागांचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

टाकळी, सुभाषनगर, मालगाव आणि बोलवाडला वादळी वाऱ्याचा तडाखा

टाकळी : टाकळी, सुभाषनगर, मालगाव आणि बोलवाड परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले. सुभाषनगर येथील द्राक्ष व्यापारी महंमद हसन पाशा बेळगे यांच्या घर आणि कार्यालयावरील पत्रे उडून गेल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी आणि महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सुभाषनगर परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली. कर्नाटकातून द्राक्ष व्यापारासाठी आलेले पाशा बेळगे यांचे घर आणि कार्यालयाचे पत्रे संपूर्ण सांगाड्यासह सुमारे २०० फुटावर जाऊन पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की पत्र्याच्या शेडमध्ये उभी असलेली चारचाकी गाडीही वाऱ्यामुळे भिंतीवर आदळली, ज्यामुळे भिंतीचेही नुकसान झाले. तसेच कार्यालयातील एसी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले. वाऱ्याच्या जोरामुळे कार्यालयातील साहित्यही उडून गेले. 

दरम्यान, द्राक्ष पॅकिंगसाठी आणलेले सुमारे तीन लाख रुपयांचे रंगीबेरंगी कागद गोडाउनमध्ये ठेवले होते. मात्र, गोडाउनवरील पत्रे उडाल्याने पावसाच्या पाण्यात हे सर्व कागद भिजून पूर्णपणे खराब झाले. या वादळात अरुण गडकरी यांच्या गोठ्याचे पत्रे उडून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले, तर नंदीवाले वस्तीतील हर्षला बाबर यांच्या घराचेही पत्रे उडून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्कल बाळकृष्ण नागरगोजे आणि तलाठी नागेश वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.

पॅकिंग साहित्याचे मोठे नुकसान

पाशा बेळगे यांनी द्राक्ष पॅकिंगसाठी नुकतेच तीन लाख रुपयांचे कागद खरेदी केले होते. मात्र, वादळी पावसामुळे हे सर्व कागद भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

त्वरित मदतीची मागणी

टाकळी, बोलवाड आणि सुभाषनगर परिसरात पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा पूर्ण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सोसायटीचे चेअरमन अरुण गडकरी, माजी उपसरपंच सुलेमान मुजावर आणि ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर यांनी केली आहे.

Web Title : सांगली जिले में बारिश का कहर; मिराज में तूफान से तबाही

Web Summary : सांगली जिले में भारी बारिश और तूफान से मिराज और पलूस में नुकसान हुआ। घर क्षतिग्रस्त, पेड़ उखड़े, बिजली बाधित। अंगूर और अन्य फसलों को भारी नुकसान। प्रभावित किसानों के लिए तत्काल मुआवजे की मांग की गई है।

Web Title : Sangli District Hit by Rain; Storm in Miraj Causes Havoc

Web Summary : Heavy rain and storms lashed Sangli district, causing damage in Miraj and Palus. Houses were damaged, trees uprooted, power disrupted. Grape and other crops suffered significant losses. Immediate compensation is requested for affected farmers.