मुसळधार पावसाने सांगली तुंबली, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार; वारणा धरणाचे दोन दरवाजे उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 14:04 IST2025-09-16T14:03:55+5:302025-09-16T14:04:29+5:30
चौकाचौकात पाणीच पाणी, वाहतूक विस्कळीत

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : मुसळधार पावसाने सोमवारी सांगली शहर जलमय झाले. शहरातील मुख्य रस्त्यासह चौकाचौकात पाणी साचले होते. उपनगरातील काही घरांत पावसाचे पाणी शिरले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.
सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने शहराला झोडपले. तास ते दीड तास पावसाचा जोर होता. या पावसामुळे स्टेशन चौक, काँग्रेस कमिटी, शिवाजी मंडई, झुलेलाल चौकासह विविध ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. स्टेशन चौकात दोन्ही रस्त्यावर पाणी साचल्याने त्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागत होती. शिवाजी मंडईत पावसामुळे भाजी विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. मंडईत गुडघाभर पाणी होते. झुलेलाल चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
शहरातील गटारी, नाले ओव्हरफ्लो झाले होते. उपनगरातील अनेक वस्त्यांमध्ये नाल्याचे आणि पावसाचे पाणी शिरले. मोकळ्या प्लाॅटमध्ये पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. मुख्य गावठाणमध्येच रस्ते पाण्याखाली गेले होते. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरही पाणी साचून होते. काही अपार्टमेंटच्या तळघरात पाणी शिरले होते.
वाहतुकीची कोंडी
मुसळधार पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. स्टेशन चौक, महापालिका, झुलेलाल चौक या परिसरात वाहतुकींची कोंडी झाली होती.
हातनूरसह परिसरात जोरदार पाऊस
हातनूरसह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढली होती. त्यामुळे दुपारी साडेचारच्या दरम्यान जोरदार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. तर त्यानंतर बारीक रिमझिम ७ नंतर ही सुरूच राहिला. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. हातातोंडाशी आलेली कडधान्य या पावसामुळे हातातून जातात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी ७० मिलीमीटर तर रविवारी चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
वारणा धरणाचे दोन दरवाजे उघडले
शिराळा : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणाचे दोन दरवाजे तसेच दोन्ही वीजनिर्मिती केंद्रे सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली आहेत. आता दरवाजे व वीजनिर्मिती केंद्रांतून ४९८० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे पुन्हा नदीपातळीत हळूहळू वाढ होत आहे.
वारणा धरण ९९.०३ टक्के भरले आहे. वारणा धरणातून दि. १ जूनपासून आजअखेर ३२.१७ टीएमसी पाणी सोडण्यात आले. तालुक्यात ही लहान-मोठ्या पावसाच्या सरी पडत आहेत. पाथरपुंज येथे १३४ मिमी पाऊस पडला असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दि.१ जून पासून २२ वेळा वारणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले होते. मात्र, पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने पुन्हा हे दरवाजे उघडले आहेत.
पाणलोट क्षेत्रातील २४ तासांतील पाऊस कंसात एकूण पाऊस (मिमी मध्ये)
- पाथरपुंज : १३४ (७१९१)
- निवळे : नोंद नाही (५१५५)
- धनगरवाडा : २५ (३२०६)
- चांदोली : ७ (२७९२)
- वारणावती : ७(२७२४)