सांगलीकरांचे आजार वाढण्यामागे यंत्रणांचे षडयंत्र?, पैसे घेऊन महापालिकेचा आरोग्याशी खेळ

By अविनाश कोळी | Published: June 17, 2024 04:29 PM2024-06-17T16:29:16+5:302024-06-17T16:29:47+5:30

दिवसेंदिवस सांगलीकरांचे शरीर कमजोर होत आहे. कुणी कोरोनाला, तर कुणी पोटात जाणाऱ्या अन्नाचे कारण देत आहे. प्रत्यक्षात या दोन्ही ...

Health problems for citizens due to sewage from Sheri Nala in Sangli | सांगलीकरांचे आजार वाढण्यामागे यंत्रणांचे षडयंत्र?, पैसे घेऊन महापालिकेचा आरोग्याशी खेळ

सांगलीकरांचे आजार वाढण्यामागे यंत्रणांचे षडयंत्र?, पैसे घेऊन महापालिकेचा आरोग्याशी खेळ

दिवसेंदिवस सांगलीकरांचे शरीर कमजोर होत आहे. कुणी कोरोनाला, तर कुणी पोटात जाणाऱ्या अन्नाचे कारण देत आहे. प्रत्यक्षात या दोन्ही घटकांपेक्षाही मोठा शारीरिक आघात पाण्याच्या माध्यमातून केला जात आहे. अनेक शासकीय यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या पोटात विष कालविण्याचा उद्योग अनेक वर्षांपासून सुरू आहे. तोही जनतेचेच पैसे घेऊन जी नागरिकांची अवस्था, तीच जलचर प्राण्यांचीही झाली आहे. नदीतील माशांपासून नदीकाठच्या शेतीपर्यंत साऱ्यांनाच या प्रदूषणाचा विळखा पडला आहे. या षडयंत्राचा पर्दाफाश करणारी मालिका वाचा आजपासून..

अविनाश कोळी

सांगली : एक नव्हे, अनेक आजारांनी सांगलीकर त्रस्त आहेत. त्यांचे शरीर आजारांचे आगार होऊ पाहात आहे. कर भरून जे पाणी महापालिका जनतेला पाजत आहे, त्या पाण्यातून आरोग्याशी खेळ खेळला जात असताना कोणीही त्यावर आवाज उठविण्यास तयार नाही. २०१६ मध्ये काही अभ्यासकांनी शेरी नाल्याचा अभ्यास करताना गंभीर निरीक्षणे मांडली होती. हा अभ्यास होऊन आता आठ वर्षे उलटल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. वेळीच या गोष्टी थांबल्या नाहीत तर आजारी माणसांचे शहर म्हणून सांगलीची ओळख निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

देशातील चौथी मोठी नदी असलेली कृष्णा सांगलीला लाभल्यानंतर समृद्धीचे दान तिने दिले. रिटर्न गिफ्ट म्हणून आधुनिक सांगलीकरांनी या नदीला शेरी नाल्याची भेट दिली. सांगलीचा मोठा भाग, माधवनगर, बुधगाव, कुपवाड, पद्माळे अशा गावांमधील सांडपाणी सांगलीतील पात्रात शेरी नाल्याच्या माध्यमातून मिसळते. हा शेरी नाला दररोज ५ कोटी ६० लाख लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे.

अभ्यास अहवाल कुणी केला?

डॉ. अजित यादव यांनी २०१६ मध्ये शिवाजी विद्यापीठास ‘शेरी नाल्याचा जल-भूवैज्ञानिक व पर्यावरणीय अभ्यास’ हा शोधप्रबंध सादर केला होता. शेरी नाल्याबद्दलचा परिपूर्ण अभ्यास करून त्यांनी अनेक गंभीर निष्कर्ष काढले आहेत.

अहवालात काय म्हटले आहे?

  • शेरी नाल्यामुळे होत असलेल्या नदीच्या विषारीपणाचा जनतेच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी ७० प्रतिनिधींनी अनेक घरगुती नमुने गोळा केले होते.
  • त्यात असे आढळून आले आहे, की ९ टक्के कुटुंब कॉलराने, १३ टक्के कावीळने, ६४ टक्के विविध पोटविकाराने, तर १४ टक्के टायफाईड आजाराने ग्रस्त आहेत.
  • नदीच्या पाण्यात अनेक रासायनिक घटक मिसळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
  • जलचरांसह मानवी आरोग्यास शेरी नाल्याचे सांडपाणी नदीत मिसळणे अत्यंत धोकादायक आहे.


हे षडयंत्र नव्हे तर काय?

महापालिका नदीत सांडपाणी सोडते म्हणून दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेकडून दीड कोटी रुपयांचा दंड गोळा करीत आहे. पैसे घेऊन मंडळ महापालिकेला प्रदूषणास परवानगी देते, तर महापालिका नागरिकांचे पैसे घेऊन नागरिकांनाच दूषित पाणी पाजते. शासन स्तरावर नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने शेरी नाला शुद्धीकरण प्रकल्प रेंगाळला आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी नदी प्रदूषण सुरू ठेवण्यासाठीच प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: Health problems for citizens due to sewage from Sheri Nala in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.