Sangli: पडळकरांना समज दिली, पण जयंत पाटील बचाव मोहीम नको - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:31 IST2025-09-27T14:30:15+5:302025-09-27T14:31:52+5:30
पुण्यातील ३५० कोटींच्या जमिनीच्या घोटाळ्याबाबत जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे, पण त्याला आम्ही घाबरत नाही.

Sangli: पडळकरांना समज दिली, पण जयंत पाटील बचाव मोहीम नको - चंद्रकांत पाटील
सांगली : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापू पाटील यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला किंबहुना मानवी संस्कृतीलाही मान्य नाही. त्यावरून त्यांना आम्ही समज दिली आहे, पण त्यावरून विरोधकांनी जयंत पाटील बचाव मोहीम करू नये, असे आवाहन सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगलीत महापालिकेच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
जयंत पाटील यांची पिलावळ शांत राहिली, तर आम्ही सांगलीतील १ ऑक्टोबर रोजीची सभा रद्द करू, असेही पालकमंत्री म्हणाले. ते म्हणाले, जिल्ह्यात आजपासून असे विषय होणार नाहीत असे जयंत पाटील यांनी जाहीर करावे, मग आम्हीही सभा घेणार नाही.
पुण्यातील ३५० कोटींच्या जमिनीच्या घोटाळ्याबाबत जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे, पण त्याला आम्ही घाबरत नाही. मग लॉटरी घोटाळ्यात त्यांचे नाव घेतले की ते अस्वस्थ का होतात? आम्ही टोप्या फेकल्या, त्या तुमच्या डोक्यावर का बसल्या? तुम्ही धुतल्या तांदळासारखे असाल तर अस्वस्थ का होता? काचेच्या घरात बसून दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणे बंद करावे.
पाटील म्हणाले, ३५० कोटींच्या जमिनीच्या विषयात दहावेळा चौकशी होऊनही काही सिद्ध झाले नाही. आता अकराव्यावेळीही चौकशी होऊ दे. लाॅटरी घोटाळ्यात तुमचे नाव न घेताही तुम्ही अस्वस्थ का होताय? ठाणे जिल्ह्यातील एक आमदार व बिल्डर परमार डायरी, एका पक्षाचा नेता व मार्केट कमिटी घोटाळा अशा टोप्या आम्ही फेकल्या, त्या तुमच्या डोक्यावर का बसल्या? पडळकर जे बोलले ते आम्हाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य नाही. जयंत पाटील बचाव नावाने झालेल्या सभेत फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले. आम्ही हे चालू देणार नाही. त्यामुळे दि. १ ऑक्टोबर रोजी सांगलीत इशारा सभा घेतली आहे.
२० नेते एकत्र बसू
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील राजकीय संस्कृती खूपच घसरली आहे. यासंदर्भात राज्यातील प्रमुख २० नेत्यांनी एकत्रित बसून यावर विचारविनिमय करावा असे गेली दोन वर्षे सांगतोय, पण कोणालाही काहीही पडलेले नाही. परिणामी, कोणीही काहीही बोलत आहेत.