विद्यार्थ्यांच्या भावविश्वातलं सुवर्णपान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:57+5:302021-03-08T04:25:57+5:30

माझा अपघात झाला, तेव्हा एका मुलाने मी बरी व्हावी म्हणून तीन दिवस उपवास केला. मातृछत्र हरपलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या ...

The golden drink of the students' brotherhood | विद्यार्थ्यांच्या भावविश्वातलं सुवर्णपान

विद्यार्थ्यांच्या भावविश्वातलं सुवर्णपान

माझा अपघात झाला, तेव्हा एका मुलाने मी बरी व्हावी म्हणून तीन दिवस उपवास केला. मातृछत्र हरपलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या लग्नात मला आईचा मान दिला. अशा अनेक घटनांनी माझं भावविश्व समृद्ध झाले. या घटना कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठ्या आहेत. अध्यापनाच्या आजवरच्या सेवेचं हे फलित माझ्यासाठी अनमोल असेच आहे. स्वप्नं साकार झाले, पण या स्वप्नांनी माझ्या आयुष्यही सुंदरपणे साकारले.

- सौ. सुवर्णा संजय ठिगळे, शिक्षिका, शाळा क्र. १, कसबे डिग्रज

एखादा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे व त्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करीत ती उंची गाठणे हे काम खूप कठीण असते, मात्र प्रयत्न, चिकाटी, प्रामाणिकपणा या जोरावर अशी कठीण ध्येय साध्य करता येतात, ही गोष्ट शिक्षिका सौ. सुवर्णा संजय ठिगळे यांनी त्यांच्या वाटचालीतून सिद्ध केली.

मिरजेतील एका व्यापारी पेढीत दिवाणजीचे काम करणाऱ्या महारुद्र कोठावळे व त्यांच्या पत्नी सुभद्रा यांच्या पाेटी सुवर्णा यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. त्यांना एक मोठा व एक लहान असे दोन भाऊ आहेत. घरात एकुलती मुलगी म्हणून सुवर्णा या सर्वांच्या लाडक्या होत्या. बालपणी त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. प्राथमिक शिक्षण मिरजेतील नगरपालिकेच्या शाळा क्र. २ मध्ये झाले. वडिलांनी तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्याची जिद्द बाळगली होती. त्यामुळे त्यांनी दिवाणजीची नोकरी सोडून भिलवडीत व्यापार सुरू केला. त्यामुळे हे कुटुंब भिलवडीला गेले. भिलवडी येथे सुवर्णा यांचे माध्यमिक शिक्षण झाले. याच काळात इंग्रजी शिकविणारे बी. डी. वाळवेकर यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. भविष्यात वाळवेकर सरांसारखेच आपण अध्यापन करायचे, असे मनोमन त्यांनी ठरविले. त्यानंतर त्यांनी सांगलीत डी. एड. चे शिक्षण घेतले. तासगावात बी.ए.ची पदवी घेतली. पैसे खर्च न करता गुणवत्तेच्या जोरावर त्यांना पुणे जिल्ह्यात तांभड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरी लागली. अध्यापनाची स्वप्नपूर्ती झाली. लग्नाच्या बाबतीतही त्यांनी काही गोष्टी मनात ठरविल्या होत्या. आपल्यापेक्षा मोठ्या पदावर असणाऱ्या, लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची धमक असणाऱ्या व हुंडा न मागणाऱ्या तरुणाशीच विवाह करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यानंतर १९९० ला त्यांना प्राध्यापक संजय ठिगळे यांचे स्थळ आले. मनातील सर्व गोष्टींची पूर्तता करणारे हे स्थळ होते त्यामुळे त्यांनी लगेच होकारही दिला.

लग्नानंतरही संसाराचा डोलारा सांभाळत, कसरत करीत त्यांनी नोकरी व पुढील शिक्षणाची धडपड सुरू केली. त्यानंतर त्यांनी बी. एड. व एम. ए. ची पदवी घेतली. पुण्यातील तांभड, खानापूर तालुक्यातील येवलेवाडी, मिरज तालुक्यातील बामणाेली, कवलापूर व आता कसबे डिग्रज जिल्हा परिषद शाळेत त्यांनी ३० वर्षे अध्यापन केले आहे. या काळात त्यांना त्यांचे पती प्रा. संजय ठिगळे यांनी मोलाची साथ दिली. आई-वडिलांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बळ दिले. नोकरी म्हणून कधीही अध्यापनाचा विचार न करता ती सेवा व जगण्याची उर्जा म्हणून केला. त्यामुळे एक चांगली पिढी त्यांना घडविता आली. बदली झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात येणारे अश्रू, त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या प्रसंगात दिला जाणारा मान, अपघात झाल्यानंतर त्यांच्यासाठी ठेवले जाणारे उपवास, केल्या जाणाऱ्या प्रार्थना हे सर्व एखाद्या चित्रपटातील भावनिक प्रसंगाला साजेसे वाटते. आयुष्यात त्यांनी विद्यार्थ्यांचे भावविश्व असे समृद्ध केले. त्यामुळेच त्यांना सांगलीतील अस्मिता फाउंडेशन, जयसिंगपूर येथे सावित्रीच्या लेक संघटनेतर्फे, जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे तसेच ग्रामपंचायत बामणोली यांच्याकडून‘आदर्श शिक्षिका पुरस्कार' त्यांना देण्यात आला. अध्यापनासह ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग, पूरग्रस्तांना मदत, पथनाट्य, प्रबोधन फेऱ्यांमध्ये पुढाकार तसेच शंभरहून अधिक समाजप्रबाेधनपर व्याख्यानातून त्यांनी सामाजिक चळवळही जोपासली. प्रदीर्घकाळ शिक्षण शेत्रात कार्य करीत असताना त्यांनी अनेक राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला वेगवेगळ्या विषयावर संशोधन पेपर सदर केले. संशोधन संस्थामध्ये प्रशिक्षणही पूर्ण केले.

Web Title: The golden drink of the students' brotherhood