Sangli News: पॅसेंजरमध्ये मुलीचा विनयभंग, रेल्वे तिकीट तपासनिसाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:04 IST2022-12-28T14:04:08+5:302022-12-28T14:04:33+5:30
प्रवासी दाम्पत्यास केली बेदम मारहाण

Sangli News: पॅसेंजरमध्ये मुलीचा विनयभंग, रेल्वे तिकीट तपासनिसाविरुद्ध गुन्हा
मिरज : परळी-मिरज पॅसेंजर रेल्वेत मुलीला खेटून बसण्यास विरोध केल्याने तिकीट तपासनिसाने प्रवासी दाम्पत्यास बेदम मारहाण केली. याप्रकरणी प्रवीण सुखदेव घाडगे (वय ३२, नेमणूक मिरज, रा. घाडगे वस्ती, मु. पो. टाकळी, ता. माढा) या रेल्वे तिकीट तपासनिसाविरुद्ध मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इचलकरंजीतील यंत्रमाग कामगार पत्नी व मुलीसोबत नातेवाइकाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी सांगोला येथे गेले होते. रविवार, दि. २५ रोजी इचलकरंजीस परतण्यासाठी ते सांगोला स्थानकात परळी-मिरज पॅसेंजर गाडीच्या जनरल बोगीत बसले. कवठेमहांकाळ ते सलगरेदरम्यान प्रवीण घाडगे हा तिकीट तपासनीस त्यांच्याजवळ येऊन ‘मी रेल्वे कर्मचारी आहे मला जागा द्या’, असे म्हणत त्यांच्या १९ वर्षाच्या मुलीजवळ बसला. यावेळी मुलीच्या वडिलांनी घाडगे यास ‘तुमची बॅग खाली ठेवा व नीट बसा’ असे सांगितल्याने, ‘मी बॅग काढत नाही, मी नीट बसत नाही, तुला काय करायचे आहे ते कर.’ असे म्हणत घाडगे मुलीच्या बाजूस खेटून बसला.
मुलगी घाबरल्याने मुलीच्या वडिलांनी घाडगेस बाजूला जाऊन बसण्यास सांगितले. यावर चिडलेल्या घाडगेने मुलीच्या वडिलांच्या पोटात लाथ मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलीच्या आईने अडविण्याच्या प्रयत्न केल्याने तिलाही मारहाण करून ढकलून दिले. यावेळी तिचा चष्मा तुटला. यावेळी सोबतच्या रेल्वे प्रवाशांनी घाडगे याला रोखले. सायंकाळी मिरज रेल्वे स्थानकात गाडी आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवीण घाडगे या तिकीट तपासनिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने खळबळ उडाली होती.