गुंड गज्या मारणेचा साथीदार पांड्या मोहितेला अटक, पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाची सांगलीत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:09 IST2025-05-16T18:06:53+5:302025-05-16T18:09:54+5:30
सांगली : कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे याला आर्थिक रसद पुरवणारा टोळीतील सदस्य बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते ...

गुंड गज्या मारणेचा साथीदार पांड्या मोहितेला अटक, पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाची सांगलीत कारवाई
सांगली : कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे याला आर्थिक रसद पुरवणारा टोळीतील सदस्य बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते (वय ४०, रा. सीतारामनगर, सांगली) याला पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. ‘मोक्का’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पांड्याला १७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुंड गज्या मारणे याला ‘मोक्का’ न्यायालयाने ३ मार्च २०२५ पर्यंत ज्युडिशियल कोठडी सुनावली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सांगलीतील मध्यवर्ती कारागृहात शासकीय वाहनाने पाठवले. गज्या मारणे टोळीतील सांगलीचा सदस्य पांड्या मोहिते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पांड्या व टोळीतील साथीदारांनी पुणे, सातारा व सांगली येथील ४० ते ५० गुन्हेगारांना एकत्र करून टोळी बनवली होती. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते दहशत निर्माण करत होते.
गुंड गज्याला शासकीय वाहनातून नेताना पांड्याने पाठलाग केला, तसेच गज्याला आर्थिक व इतर प्रकारची मदत केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते, तसेच तांत्रिक पुरावेदेखील मिळाले होते. गज्या मारणे याला आर्थिक व इतर प्रकारची रसद पुरवणाऱ्या पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे शहरचे पोलिस उपआयुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पथक तयार करण्यात आले. या पथकाने मारणे टोळीतील सदस्य बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते याला सीतारामनगर येथील खोलीतून बुधवारी पहाटे ताब्यात घेतले.
उपआयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अंमलदार मोकाशी, कुंभार यांच्या पथकाने कारवाई केली.
पोलिस कोठडीत रवानगी
पुणे येथे आणल्यानंतर त्याची चौकशी केली. तेव्हा त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याला अटक करून मोक्का न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा १७ मे पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला.