Sangli Crime: घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २६ लाखांचा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:11 IST2025-06-04T16:11:12+5:302025-06-04T16:11:31+5:30
संतोष चव्हाण रेकॉर्डवरील गुन्हेगार

Sangli Crime: घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २६ लाखांचा ऐवज जप्त
सांगली : जत, विटा, चिंचणी वांगी, इस्लामपूर व आटपाडी परिसरात घरफोड्या करणाऱ्या चौघांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. बंद दुकाने व घरे फोडून चोरी करण्याची त्यांची पद्धत होती.
चोरीतील सोनेचांदीचे दागिने विकण्यासाठी जात असताना सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दागिने, चारचाकीसह २६ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांपैकी एकावर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
संतोष तुळशीराम चव्हाण (वय ४२), आशुतोष संतोष चव्हाण (वय २१, दोघेही रा. एकता नगर, सातारा रस्ता, जत), करण अर्जुन चव्हाण ( वय १९, रा. होनसळ, ता. सोलापूर) व पांडुरंग सुनील पवार (वय २६, रा. होटगी, सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. या चौघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने ही कारवाई केली. जत परिसरात चोरीतील माल विक्रीसाठी काही चोरटे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. वर्धन यांच्या पथकामधील प्रमोद साखरपे, हणमंत लोहार, सोमनाथ गुंडे यांचा त्यात सहभाग होता. जत ते कवठेमहांकाळ रस्त्यावरील जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांच्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे सापळा लावला.
तेथे संशयित चौघे जण एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीने आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गाडीत सीटखाली सोन्याचे व चांदीचे दागिने, स्टीलची पाइप, कटावणी, चाकू, पाना, स्कू ड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हातमोजे मिळाले. गेल्या काही महिन्यांत जत, विटा, इस्लामपूर, चिंचणी वांगी व आटपाडी परिसरात बंद घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. पथकाने आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलिसांच्या ताब्यात दिला.
संतोष चव्हाण रेकॉर्डवरील गुन्हेगार
संशयित संतोष चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर जत व कर्नाटकमध्ये घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुलगा आशुतोषही गुन्ह्यात सहभागी होत आहे.