सांगली जिल्हा बँकेच्या दिघंचीची शाखेत बनावट खाते उघडून फसवणूक, तत्कालीन शाखाधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:30 IST2025-08-19T19:29:08+5:302025-08-19T19:30:33+5:30
आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बनावट कागदपत्राद्वारे खाते काढून २ लाख ७८ हजार ८७५ ...

सांगली जिल्हा बँकेच्या दिघंचीची शाखेत बनावट खाते उघडून फसवणूक, तत्कालीन शाखाधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा
आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बनावट कागदपत्राद्वारे खाते काढून २ लाख ७८ हजार ८७५ रूपये कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संशयित दीपक लक्ष्मण चव्हाण (रा. दिघंची), उंबरगाव विकास सोसायटीचा तत्कालीन अध्यक्ष व सचिव, जिल्हा बँकेच्या शाखेचा तत्कालीन शाखाधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संजय मुरलीधर मोरे (वय ३८, रा. तरटीमळा, दिघंची) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संशयित दिपक चव्हाण आणि विकास सोसायटीचा अध्यक्ष, सचिव तसेच बँकेचा तत्कालीन शाखाधिकारी यांनी संगनमत करून फिर्यादी संजय मोरे आणि त्यांच्या भावाचे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड व शेतीचे कागदपत्रे जाेडून, खोट्या सह्या करून उंबरगाव सोसायटीत सभासद नोंदणी केली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिघंची शाखेत देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे तसेच दुसऱ्याच कोणाचे तरी फोटो जोडून, खोट्या सहया करून बनावट बँक खाते उघडण्यात आले.
या खात्यातून फिर्यादी मोरे व त्यांच्या भावाच्या नावावर कर्ज काढण्यात आले. ही कर्जाची रक्कम संशयित दिपक चव्हाण याने स्वतःच्या ‘इंद्रा ट्रेडिंग कंपनी’च्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यावर वर्ग करून घेतली. यानंतर फेब्रुवारी २०१९ पर्यंत या कर्जाची परतफेड दाखवण्यासाठी श्री सद्गुरू साखर कारखान्याकडून फिर्यादी मोरे यांना आलेले उसाचे बिल वापरले गेले. प्रत्यक्षात फिर्यादी मोरे यांना उसाच्या बिलापोटी आलेल्या २ लाख ७८ हजार ८७५ रुपयांच्या रकमेचा हिशोब न देता ती रक्कम जिल्हा बँकेच्या शाखेत वर्ग करण्यात आली.
फिर्यादी मोरे यांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून सर्व माहिती संकलित केली. त्यानंतर आटपाडी पोलिस ठाण्यात संशयित चव्हाण, सोसायटीचा तत्कालीन अध्यक्ष व सचिव, बँकेचा तत्कालीन शाखाधिकारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.