Sangli: कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन महिलांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:33 IST2025-07-19T14:31:32+5:302025-07-19T14:33:18+5:30
सरबतामधून विष घेतले

Sangli: कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन महिलांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
कवठेमहांकाळ (जि.सांगली) : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५), काजल समीर पाटील (वय ३०, दोघीही रा. नांगोळे) यांचा मृत्यू झाला. तर समीर अल्लाउद्दीन पाटील (वय ३५) आणि अल्लाउद्दीन मकबूल पाटील (वय ५५) या दोघांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतून चौघांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सामूहिक आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अस्पष्ट असून, कवठेमहांकाळ पोलिस कसून तपास करत आहेत.
नांगोळे गावातील पाटील कुटुंब ढालगाव रस्त्यालगत वास्तव्यास होते. अल्लाउद्दीन पाटील यांच्या आई शुक्रवारी शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी घरातील सदस्यांना आवाज दिला. परंतु, आतून प्रतिसाद आला नाही. घरातील कोणी बाहेर येत नसल्याचे पाहून त्यांच्या आईने घरात जाऊन पाहिले असता, घरात मुलगा, सून, नातू व नातसून निपचिप अवस्थेत पडल्याचे दिसताच त्यांना धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलावून घेतले.
त्यानंतर सर्वांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, रमेजा पाटील व काजल पाटील या दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तर समीर पाटील, अल्लाउद्दीन पाटील हे दोघे अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सरबतामधून विष घेतले
घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केल्यावर त्यांना चार ग्लास व लिंबू आढळले. विषारी औषधाची बाटलीही त्याठिकाणी आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. लिंबू सरबतमधून चौघांनी विषारी औषध प्राशन केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे
जादूटोण्याचा प्रकार घडला होता
अल्लाउद्दीन पाटील यांच्या घराशेजारी १५ दिवसांपूर्वी काही अज्ञात लोकांनी जादूटोण्याचा प्रकार केला होता. त्यांच्या घराशेजारी बिबे, बाहुल्या, टाचणी टोचलेले लिंबू, नारळ अशा वस्तू आढळल्या होत्या. जादूटोण्याच्या या प्रकारामुळे पाटील कुटुंबीय गेल्या १५ दिवसांपासून भयभीत होते. सामूहिक आत्महत्येच्या प्रकारामुळे गावात याची चर्चा सुरू आहे.