Sangli: मिरज सिव्हिलमध्ये आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न करणारे फरारी चौघे जेरबंद, चार तासांत आळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:52 IST2025-11-14T18:51:45+5:302025-11-14T18:52:55+5:30
गांधी चौक पोलिसांची कारवाई

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न करणारे फरारी चौघे जेरबंद, चार तासांत आळल्या मुसक्या
मिरज : मिरजेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खूनप्रकरणातील आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरारी असलेल्या चारजणांना गांधी चौक पोलिसांनी केवळ चार तासांत जेरबंद केले.
मिरजेतील निखिल कळगुटगी याच्या खुनातील आरोपी सलीम पठाण, चेतन कलगुटगी, सोहेल तांबोळी, विशाल शिरोळे यांना मिरज शहर पोलिसांनी बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले होते. यावेळी वंश वाली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार संशयास्पदरीत्या तेथे थांबल्याचे पोलिस हवालदार राजेश गवळी यांना दिसले.
गवळी यांनी त्यास पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे लोडेड गावठी पिस्तूल व लोखंडी कोयता सापडला. पळून गेलेले चारजण मिरजेत एका ठिकाणी थांबले असून, तेथून ते परराज्यात पळून जाणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.
सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने सापळा रचत तेथे छापा टाकून अक्षय फोंडे, समर्थ पोतदार व समर्थ गायकवाड यांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वैभव आवळे याला पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले. या कारवाईत सर्व फरार आरोपी चार तासांत जेरबंद झाले.
सलीम पठाण याच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी वंश दिनकर वाली (२०, रा. दत्तनगर, पवनचक्कीजवळ, मिरज), समर्थ संजय गायकवाड (२१, रा. १०० फुटी रोड, हडको कॉलनी, मिरज), आकाश जगन्नाथ फोंडे (२१, रा. म्हाडा कॉलनी, आंबेडकरनगर, मिरज), वैभव राजाराम आवळे (२८, रा. १०० फुटी रोड, हडको कॉलनी, मिरज), सौरभ प्रसाद पोतदार (२३, रा. म्हाडा कॉलनी, आंबेडकरनगर, मिरज) या पाचजणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वंश वालीकडून हल्ला करण्यासाठी आल्याची कबुली
वंश वाली याने त्याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोतदार व समर्थ गायकवाड हे सलीम पठाण यांच्यावर हल्ला करण्यासाठी आल्याची कबुली दिली. मात्र वंश याचे चौघे साथीदार तेथून पळून गेल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र चारजण तेथून पसार झाले.