Sangli: फसवणूकप्रकरणी विदेशी नागरिकाला ८ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विट्यातील दोघांना घातला ८५ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 14:00 IST2025-10-11T14:00:01+5:302025-10-11T14:00:36+5:30
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Sangli: फसवणूकप्रकरणी विदेशी नागरिकाला ८ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विट्यातील दोघांना घातला ८५ लाखांचा गंडा
विटा : सुमारे २७ कोटींचे युरो चलन म्हणजेच काळा पैसा बांधकाम व्यवसायात गुंतविण्याच्या बहाण्याने विटा येथील सचिन बाळकृष्ण लोटके व त्यांच्या मित्रास ८४ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी मार्क विल्यम ऊर्फ इसाई किपनगेजीत मुथाय ऊर्फ अँथोनी आयोमिना (रा. नामबिया) या विदेशी नागरिकास विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. भागवत यांनी ८ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विटा येथील सचिन लोटके हे बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करतात. विदेशी आरोपी मार्क विल्यम आणि त्याच्या दोन मित्रांची डिसेंबर २०१७ मध्ये सचिन यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी आरोपी मार्क विल्यम व त्याच्या दोन साथीदारांनी लोटके यांना कन्स्ट्रक्शन व्यवसायात गुंतवणूक करायची असल्याचे सांगितले.
आरोपींनी २७ कोटींचा काळा पैसा असल्याचे सांगितले. ब्लॅक करन्सी ग्लोबल सिक्युरिटी ऑफिस बेंगलोर येथून त्या नोटा रिलीज करण्यासाठी व सर्व प्रक्रिया केल्यानंतर काळे कागदाचे बंडल ठेवण्यासाठी लागणारे लॉकर्स याकरिता लोटके व त्यांच्या मित्राकडून वेळोवेळी ८४ लाख ८० हजार रुपये रोख घेतले.
त्यानंतर ब्लॅक करन्सी विदेशी युरोमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया करीत असताना आरोपीने दिलेले काळे कागद, लिक्वीड, ५०० युरो चलनाच्या १२० नोटा व इतर साहित्य याद्वारे आरोपीने सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली. आरोपीने दिलेले साहित्य बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लोटके यांनी विदेशी नागरिकांविरुद्ध विटा पोलिसांत फिर्याद देत गुन्हा दाखल केला. त्यानंतर १ मार्च २०१९ मध्ये त्याला अटक केली होती. त्यानंतर तो कळंबा कारागृहात होता.
या खटल्याची सुनावणी विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यावेळी न्यायाधीश भागवत यांनी विदेशी नागरिक असलेला आरोपी मार्क विल्यम ऊर्फ इसाई किपनगेजीत मुथाय ऊर्फ आयोमिना (रा. नामबिया) यास ८ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी २ महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. ए.एन. कुलकर्णी, ॲड. व्ही.एम. देशपांडे यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन साहाय्यक पोलिस निरीक्षक एन.बी. सावंत यांनी केला.