Sangli: आस्मानी संकटाने कवठेएकंद, तासगाव परिसरातील फुलशेती कोमेजली; लहरी हवामानाचे आव्हान कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:43 IST2025-10-09T17:42:56+5:302025-10-09T17:43:17+5:30
उतरत्या दराचाही बसतोय फटका

Sangli: आस्मानी संकटाने कवठेएकंद, तासगाव परिसरातील फुलशेती कोमेजली; लहरी हवामानाचे आव्हान कायम
प्रदीप पोतदार
कवठेएकंद : अति पावसाच्या फटक्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. तासगाव तालुक्यातील बागायती शेतीलादेखील घरघर लागली आहे. यंदा अति पावसामुळे फुल शेतीही कोमेजू लागली आहे. सध्या गुलाब, झेंडू, गलांडा, शेवंती अशा फुलांवर दावण्या आणि करपा रोगाचे संकट आहे. अति पावसाच्या परिणामामुळे फुलशेतीस मोठे आव्हान उद्भवले आहे.
तासगाव आणि परिसरात प्रामुख्याने गुलाब, झेंडू, गलांडा अशी फुलशेती नेहमी बहरलेली असते. तासगावचा गुलाब मुंबई मार्केटसह सर्वत्र प्रसिद्ध आहे, परंतु यंदा सततच्या पावसामुळे फुलशेतीसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. मे महिन्यापासून सातत्याने परिसरात पाऊस पडत आहे. अति पावसामुळे झेंडू व इतर फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. अति पाण्यामुळे शेकडो एकर फुलांचे क्षेत्र वाया गेले आहे.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यावेळी फुलांना चांगला दर मिळतो. या अपेक्षेने अनेक जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत अनेक शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे ओढ घेतली होती, मात्र यंदा सततच्या पावसामुळे उत्पादन घेता आले नाही. परिणामी शेती पूर्णपणे नुकसानीत गेली आहे. सध्या मुंबई मार्केटमध्ये शेवंती आणि झेंडूचे दर २० ते ३० रुपये प्रति किलो तर गुलाबाचे ८० ते १०० रुपये प्रति किलो आहेत. लोकल मिरज मार्केटमध्ये गलांडा आणि झेंडू प्रति किलो ३० रुपये दरात विकले जात आहेत. दसऱ्यानंतर दरात घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा जास्त खर्च सहन करावा लागत आहे.
वाढती मजुरी, व्यापारी कमिशन, दलाली आणि बाजारातून मिळणाऱ्या किमतीमुळे फुलशेती तोट्यात जात असल्याचे फुलशेतकरी सांगतात. मुंबई मार्केटमध्ये पंधरा टक्के व्यापारी कमिशन घेतात. तर मिरज लोकल मार्केटमध्ये झेंडू, गलांडा, शेवंती फुलांसाठी प्रति दहा किलोला एक किलो सूट घेतली जाते. त्यात दहा ते पंधरा टक्के दलाली साधारणपणे कापली जाते. तासगाव तालुक्यात येळावी, मणेराजुरी, कवठे एकंद, बेंद्री, तासगाव परिसरात गुलाब व झेंडू शेती मोठ्या प्रमाणात केली जाते; मात्र उत्पादनखर्च खर्च फुलशेतीस पेलत नाही. सणासुदीला फुलांना चांगला दर मिळाला; पण आता दर पडले आहेत.
गुलाब शेतीवर अति पावसामुळे करपा आणि दावण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक गुलाब शेती टिकवणे अति पावसाच्या तडाख्यामुळे मोठे आव्हान बनले आहे. गुलाब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाने फुलशेतीला अनुदान द्यावे, अशी मागणी फुलशेतकऱ्यांनी केली आहे. - सुधीर मिरजकर, फुलशेतकरी, तासगाव.