सांगलीत उपनगरांमध्ये पुराचे पाणी शिरले, ६१७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:17 IST2025-08-21T18:17:05+5:302025-08-21T18:17:55+5:30
बायपास रस्त्यावर वाहतूककोंडी

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : शहरात पावसाने उसंत घेतली असली तरी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभरात पाण्याची पातळी १० ते १२ फुटांनी वाढली. शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, दत्तनगर, काकानगर परिसरातील ६० हून अधिक घरात पुराचे पाणी शिरले आहे. नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी व सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाणी आले आहे. कर्नाळ चौकी ते शिवशंभो चौक रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. पुराचा धोका वाढल्याने नागरिकांच्या स्थलांतरणासाठी महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली.
शहराचा महापुराचा धोका वाढला आहे. पावसाचा जोर दिवसभरात कमी झाला; पण कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत फुटाफुटाने वाढ होत होती. बुधवारी सकाळी ७ वाजता ३३ फूट पातळी होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत चार फुटांनी वाढ झाली. मध्यरात्रीच सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅटमध्ये पुराचे पाणी शिरले होते. महापालिकेने या परिसरातील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. दत्तनगर, काकानगर परिसरातील घरांना पाण्याने वेढा दिला आहे.
सांगली-कर्नाळ रस्ता सकाळीच पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नदीकाठवरील स्वामी समर्थ मंदिर, कृष्णामाई मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. अमरधाम स्मशानभूमीतही पाणी शिरल्याने महापालिकेने कुपवाड येथे अंत्यविधीची व्यवस्था केली. सांगलीवाडीच्या स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे.
पुराचा संभाव्य धोका ओळखून महापालिकेने सकाळपासून नागरिकांना स्थलांतर करण्याचा सूचना केल्या. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नीलेश देशमुख यांनी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ चौक परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
वाहनतळावरील वाहने स्थलांतराच्या सूचना
वखारभाग येथील ट्रक टर्मिनलमधील वाहने तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपायुक्त अश्विनी पाटील यांनी दिल्या. पाटील यांनी सहायक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह वाहनतळाला भेट दिली. वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. संभाव्य पूरस्थितीत वाहनांना कोणत्याही धोका होऊ नये, यासाठी वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या.
हे रस्ते, वस्त्या पाण्याखाली
सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, कर्नाळ रोड, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ काॅलनी
सांगली-कर्नाळ रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
बायपास रस्त्यावर वाहतूककोंडी
सांगली बायपास रस्त्यावर सकाळपासून वाहतुकीची कोंडी झाली होती. कर्नाळ चौकी रस्ता बंद झाल्याने वाहतुकीचा ताण या रस्त्यावर आला. त्यामुळे सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडीत जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या गाड्या अडकल्या. वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाण मांडले होते. वाहतूक शाखेकडून १२ ठिकाणी १८ पोलिस वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत होते.
६१७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, दत्तनगर परिसरात पुराचे पाणी शिरले. या परिसरातील ११३ कुटुंबातील ५६ नागरिकांना महापालिकेने सुरक्षितस्थळी हलविले. काही कुटुंबांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात आसरा घेतला तर काहींनी नातेवाइकांकडे जाणे पसंत केले. दिवसभर पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांची गाठोडे बांधण्यासाठी धावपळ उडाली होती.
सूर्यवंशी प्लाॅटमधील २६ कुटुंबातील १४० जणांना रात्रीच स्थलांतरित करण्यात आले. आरवाडे पार्कमधील २६ कुटुंबातील १३८, कर्नाळ रोड, पटवर्धन काॅलनी ५० कुटुंबातील २४४, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभो चौक, दत्तनगर परिसरातील ११ कुटुंबातील ४२ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यातील १०२ कुटुंबातील ५२२ नागरिकांनी नातेवाइकांकडे आसरा घेतला. तर २२ कुटुंबातील ९३ जण महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे.