पावसाची उघडीप, सांगलीत महापुराचा धोका टळला; वारणा धरणाचे दरवाजे बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:58 IST2025-08-22T15:57:41+5:302025-08-22T15:58:39+5:30
अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणातून दिवसात ७४ हजार ४०० क्युसेकने कमी करून २१ हजार ९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीचीपाणीपातळी कराड येथून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. वारणा धरण वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा विसर्ग गुरुवारी सायंकाळी ६ वाजता बंद केला आहे. विद्युत गृहातून केवळ एक हजार ६३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कृष्णा, वारणा नद्यांचा महापुराचा धोका टळल्यामुळे नदीकाठच्यासांगली, मिरज शहरासह १०४ गावांना दिलासा मिळाला आहे.
कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गुरुवारी उघडीप दिली आहे. कोयना धरण क्षेत्रात दिवसभरात केवळ १७ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात ९९ टीएमसी पाणीसाठा आहे. पाऊस कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सकाळपासून विसर्ग कमी करण्यास सुरुवात केली. बुधवारी रात्री ९५ हजार ३०० क्युसेक असलेला विसर्ग सकाळी ८० हजारांवर आणला.
त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने सकाळी दहा वाजता ६७ हजार आणि रात्री ९ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फूट ६ इंचांवरून ३ फुटांपर्यंत खाली आणून १९ हजार ८०० क्युसेक विसर्ग केला. धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार १०० क्युसेक असा एकूण कोयना नदीमध्ये एकूण २१ हजार ९०० क्युसेक विसर्ग केला आहे.
वारणा धरण क्षेत्रात दिवसभरात १५ मिलिमीटर पाऊस झाला असून ३१.३४ टीएमसी पाणीसाठा आहे. गुरुवारी धरणात पावसाची तीव्रता कमी झाल्याने सायंकाळी धरणाचे चारही वक्र दरवाजे बंद केले. मात्र विद्युत गृहातून एक हजार ६३० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
सकाळपासून कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरूच राहिली. दिवसभरात साडेतीन फुटांनी पाण्यात वाढ झाली होती. सायंकाळी सांगलीतील आयर्विन पुलाची पातळी स्थिर राहिली. कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलांसह ताकारी, बहे पुलाची पाणीपातळी कमी झाली.
अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर
पुरामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दोन हजार ३१३ नागरिकांचे स्थलांतर केले आहे. महापालिका प्रशासनाने १६९ कुटुंबातील ८३० जणांचे स्थलांतर केले आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील ८४ गावांना पुराचा फटका बसला आहे. २८६ कुटुंबातील दीड हजारांवर नागरिकांचे स्थलांतर केले.
३८ रस्ते पाण्याखालीच
कृष्णा, वारणेवरील पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारीही कायम राहिले. शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे-मांगले, वारणा नदीवरील चरण-कोडोली, आरळा-शित्तर, बिळाशी-भेडसगाव, कांदे-सावर्डे, पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव-नांद्रे, घोगाव-दुधोंडी, नागठाणे बंधारा, आमणापूर, भिलवडी पूल पाण्याखाली आहेत. याशिवाय ३८ रस्ते पाण्याखाली असल्याने वाहतूक बंदच राहिली.
कृष्णा नदीची पाणी पातळी (फूट इंचामध्ये)
- कृष्णा पूल कराड २८.११
- बहे पूल १७.६
- ताकारी पूल ५२.५
- भिलवडी पूल ४९.९
- सांगली आयर्विन ४३.६
- राजापूर बंधारा ४८.११
तालुकानिहाय चोवीस तासांतील पाऊस
तालुका - पाऊस मिलिमीटरमध्ये
- मिरज - ५.४
- जत - २.८
- खानापूर - २
- वाळवा - ५.८
- तासगाव - ३.४
- शिराळा - १६.३
- आटपाडी - १
- क. महांकाळ - ५.२
- पलूस - ४.७
- कडेगाव - २.१
प्रमुख धरणातील पाणीसाठा, विसर्ग
धरण / पाणीसाठा (टीएमसी) / टक्केवारी / विसर्ग (क्युसेक)
- कोयना - ९९.७४ / ९४ / ३६,७००
- वारणा - ३१.३३ / ९१ / १६३०
- धूम - १३.०५ / ९७ / ०००
- कण्हेर - ९.५६ / ९५ / ७४०
- उरमोडी - ९.६४ / ९७ / ४५०
- अलमट्टी - १००.५१ / ८२ / २,५०,०००