Sangli Crime: स्वस्त दरात सोने देण्याच्या बहाण्याने पावणेआठ लाखांचा गंडा; पाच जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:59 IST2025-12-10T13:58:22+5:302025-12-10T13:59:12+5:30
डिजिटल ॲपवरून आणि रोखीने रक्कम घेतली

संग्रहित छाया
जत: शहरातील शंकर कॉलनी येथील रहिवासी वशिम जहांगीर शेख (वय ३५) यांना स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८ लाख ६९ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुमित संपत गायकवाड, संपत बाबूराव गायकवाड, सुनीता संपत गायकवाड, नीशा रमेश गायकवाड आणि अक्षय मधुकर हसबे (सर्व रोहिणी ज्वेलर्स, दिघी परांडे नगर, पुणे) यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
शेख यांनी दिलेल्याफिर्यादीनुसार, २९ जून २०२२ ते १९ डिसेंबर २०२२ या कालावधीत आरोपींनी मोबाइलद्वारे संपर्क साधून ‘स्वस्तात सोने देतो’ असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार डिजिटल ॲपवरून आणि रोखीने रक्कम घेतली; मात्र त्यांनी ना सोने दिले, ना पैसे परत केले.
उलट, फिर्यादीने रकमेची मागणी केल्यावर ‘पैशाची कोठे वाच्यता केली तर जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अधिक तपास जत पोलिस करत आहेत.