अग्रण धुळगावच्या खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेप, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:31 IST2025-01-09T16:31:22+5:302025-01-09T16:31:53+5:30
यात्रेत तमाशा कार्यक्रमात दंगा केल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपींनी हत्यारे, काठ्या घेऊन भोसले बंधूंवर हल्ला चढविला होता

अग्रण धुळगावच्या खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेप, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल
सांगली : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील अशोक तानाजी भोसले (वय २३) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी हा निकाल दिला.
संदीप दादासाे चाैगुले (वय २६), विशाल बिरुदेव चौगुले (वय २३), नानासो उर्फ सागर माणिक चौगुले (वय २५), कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप (वय २५), विजय आप्पासाे चौगुले (वय २३, सर्व रा. अग्रण धुळगाव) अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आराेपींची नावे आहेत.
त्यांना जन्मठेपेसह दीड हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावास, कलम १४३ अन्वये तीन महिने सश्रम कारावास, १४७ अन्वये १ वर्ष तर कलम १४८ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा एकत्रित भोगायची आहे. खून प्रकरणातील सागर बाळासो चौगुले हा आरोपी मयत झाला आहे. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.
ही घटना २ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमात दंगा केल्याने मृत अशोक व त्याचा भाऊ प्रकाश यांनी पंच कमिटीकडे तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी कुकरी, गुप्तीसारखी हत्यारे, काठ्या घेऊन भोसले बंधूंवर हल्ला चढविला.
यात अशोक गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला हत्याराने भोसकून काठ्यांनी मारहाण केली होती. उपचारापूर्वी तो मृत झाला होता. त्याचा भाऊ प्रकाशही या घटनेत जखमी झाला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून प्रकाश भोसले, तिऱ्हाईत साक्षीदार ज्ञानेश्वर भोसले तसेच फिर्यादी असलेले त्यांचे वडील तानाजी संभाजी भोसले यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
या निकालाचा दाखला महत्त्वपूर्ण
या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सर्वोच्च न्यायालयातील ‘नित्यानंद विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार’ या प्रकरणातील निकालाचा दाखला दिला. सहआरोपी मुख्य आरोपींइतकेच जबाबदार असतात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा दाखला महत्त्वपूर्ण ठरला. त्यानुसार पाचही आरोपींना जन्मठेपेची मागणी करण्यात आली होती.
या पोलिसांची मदत कामी
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तात्कालीन पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी राजन माने, कवठेमहंकाळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्यासह पैरवी कक्षातील अशोक तुराई, वंदना मिसाळ, कवठेमहंकाळ ठाण्याचे वैभव काळे, शहाजी जाधव व अन्य पोलिसांची मदत व काम या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरले.