Sangli: ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरमध्ये; यंदा उशिरा पाणीपुरवठा, कारण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:27 IST2024-11-07T16:26:50+5:302024-11-07T16:27:13+5:30
देवराष्ट्रे : पावसाळा संपला की कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या आवर्तनाचे डोहाळे लागतात. मात्र यावर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन ...

Sangli: ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरमध्ये; यंदा उशिरा पाणीपुरवठा, कारण..
देवराष्ट्रे : पावसाळा संपला की कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या आवर्तनाचे डोहाळे लागतात. मात्र यावर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती ताकारीचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
यावर्षी पाऊस काळ चांगला असल्यामुळे अजून जमिनीमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच ओढ्या, नाल्यांमधून अजून पाणी वाहत आहे. तलाव तुडुंब आहेत. त्यामुळे शेतीला अजून तरी पाणीटंचाईची झळ लागत नाही. तरीसुद्धा ज्या परिसरात पाणीसाठा उपलब्ध नाही तसेच डोंगराळ भागातील विहिरींनी तळ गाठला आहे, अशा भागांसाठी सोय केली जाणार आहे. सोनहिरा परिसरात तसेच कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये ताकारी योजना कधी चालू होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पुरेसे पाणी यावर्षी उपलब्ध होणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता पाटबंधारे विभागाने आधीच घेतली आहे. जरा उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये आवर्तन सुरू होणार असले तरीसुद्धा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत भरपूर पाणी मिळेल, याची दक्षता पाटबंधारे विभागाने घेतली आहे. तत्पूर्वी जरी पाणीटंचाई निर्माण होऊ लागली तरी ताकारी योजनेचे आवर्तन चालू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आवर्तन सुरु रहावे
पाऊस भरपूर झाला असला तरी माळरानावरची पिके पाण्याविना जास्त काळ तग धरत नाहीत. त्यामुळे ही पिके वाळून जातात अथवा सुकतात, त्यामुळे या पिकांना नोव्हेंबर महिन्यात ताकारी योजनेचे आवर्तन चालू करून पाणी दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच पिकेही वाळणार नाहीत, त्यामुळे आवर्तन नोव्हेंबरमध्ये चालू होणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी वैभव जाधव यांनी व्यक्त केले
उत्पन्न वाढेल
नोव्हेंबर महिन्यात ताकारी योजनेचे आवर्तन चालू झाल्यास त्याचा पिकांना दिलासा मिळेल तसेच वेळेत पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, असे मत मोहिते वडगाव येथील शेतकरी विनोद मोहिते यांनी व्यक्त केले.