Sangli: जिल्हा परिषद शाळेतील पोरच हुशार; पहिलीचे विद्यार्थी करतात तब्बल हजारपर्यंत बेरीज-वजाबाकी अन् इंग्रजी स्पेलिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:49 IST2025-03-07T15:48:07+5:302025-03-07T15:49:07+5:30
हणमंतनगरची नावीन्यपूर्ण शाळा : इंग्रजी स्पेलिंगही काही सेकंदात

Sangli: जिल्हा परिषद शाळेतील पोरच हुशार; पहिलीचे विद्यार्थी करतात तब्बल हजारपर्यंत बेरीज-वजाबाकी अन् इंग्रजी स्पेलिंग
कडेगाव : इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी हजारपर्यंत बेरीज-वजाबाकी, कृतीयुक्त बाराखडी नव्हे तर सोळाखडी आणि इंग्रजी स्पेलिंग अवघ्या काही सेकंदांत सादर करून सर्वांनाच अचंबित केले. विद्यार्थ्यांनी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, सहायक गटविकास अधिकारी जालिंदर वाजे आणि विस्तार अधिकारी सुनील लोहार आदी अधिकाऱ्यांचे स्वागतही इंग्रजीतून केले.
कडेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राऊत यांनी हणमंतनगर-चिंचणी (ता. कडेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल सेमी इंग्रजी शाळेस भेट देऊन शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला.
मुख्याध्यापिका माया कुंभार यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच उपक्रमशील शिक्षक रामलिंग खाडे यांनी घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे थेट प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून सादर करून दाखवले. राऊत यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिक्षकांचा उपक्रमशील दृष्टिकोन आणि शाळेतील गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. तसेच अशा शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
धनुर्विद्या प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक
हणमंतनगर शाळा महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे, जिथे विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवली जाते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात शाळेची विशेष ओळख निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि हा नवा प्रयोग ग्रामीण भागातील शाळांसाठी दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार काढले.
रामलिंग खाडे यांचे कौतुक
या शाळेतील उपक्रम शिक्षक रामलिंग खाडे हे एमए, एमएड. आहेत. धनुर्विद्या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी या शाळेत शालेय शिक्षण व क्रीडा प्रकारात राबविलेले उपक्रम विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांचे अध्यापन कौशल्य व आधुनिक शिक्षणाच्या दिशेने हणमंतनगर शाळेने उचललेले पाऊल खरंच कौतुकास्पद आहे, असे प्रशांत राऊत म्हणाले.