Sangli: जावयाच्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:51 IST2025-01-03T17:50:31+5:302025-01-03T17:51:57+5:30
पलूस : बांबवडे (ता. पलूस) येथे पत्नी नांदायला येत नाही म्हणून झालेल्या भांडणात जावई, जावयचा भाऊ, चुलत भाऊ यांनी ...

Sangli: जावयाच्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
पलूस : बांबवडे (ता. पलूस) येथे पत्नी नांदायला येत नाही म्हणून झालेल्या भांडणात जावई, जावयचा भाऊ, चुलत भाऊ यांनी केलेल्या मारहाणीवेळी सासरे जगन्नाथ महादेव पवार (वय ५५, रा. बांबवडे, ता. पलूस) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना १ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.
याबाबत जावई प्रशांत राजाराम पाटील, त्याचा भाऊ मनोज पाटील, चुलत भाऊ रणजीत पाटील (तिघे रा. तुरची ढवळी, ता. पलूस) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सासू संगीता जगन्नाथ पवार (वय ४९) यांनी पलूस पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित तिघे पसार झाले आहेत.
अधिक माहिती अशी, मृत जगन्नाथ पवार यांची मुलगी शीतल यांचा विवाह २०१४ मध्ये प्रशांत पाटील याच्याशी झाला. पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. भांडणामुळे शीतल सासरी अनेक दिवस गेलीच नाही. प्रशांत पाटील, त्याचा भाऊ मनोज पाटील आणि चुलत भाऊ रणजीत पाटील तिघेजण शीतलला सासरी घेऊन जाण्यासाठी दि. १ रोजी दुपारी मोटार घेऊन बांबवडे येथे आले. यावेळी सासरे जगन्नाथ पाटील, पत्नी, मुलगी शीतल पाटील, सोनल साळुंखे व नात प्रितीशा, नातू शिवांश घर बसले होते. प्रशांत याने पत्नी शीतलला माहेरी चल, असा तगादा लावला. यावेळी मुलेही सोबत येत नाहीत म्हंटल्यावर प्रशांत याने पत्नी शीतलला शिवीगाळ व मारहाण करत बाहेर ओढत आणले.
प्रशांतला अडवण्यासाठी सासू - सासरे पुढे गेले असता प्रशांतचा भाऊ मनोज पाटील याने जगन्नाथ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोघा भावांनी शीतल, सासू व दोन लहान मुलांनाही मारहाण केली. मारहाणीला सासरच्यांनी विरोध करताच प्रशांत याने अंगणात पडलेली वीट सासरे जगन्नाथ यांच्या डोक्यात तीन - चार वेळा मारली. सासरे जगन्नाथ जमिनीवर बेशुद्ध पडले. त्यांची बायपास सर्जरी झाली होती. बेशुद्ध अवस्थेत त्यांना पलूस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी जगन्नाथ पवार हे मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अहवाल
शवविच्छेदन केले असता डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अहवाल सादर केला. त्यांंच्या मृत्यूस कारणीभूत होण्यास जावई प्रशांत, मनोज व रणजीत पाटील हे तिघेजण कारणीभूत असल्याची फिर्याद संगीता पवार यांनी दिली. पलूसचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील तपास करीत आहेत.