Sangli: भू-संपादनाचा मोबदला मिळाला नाही, पुणदी-जुनेखेड नदी पुलाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांनी केला बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:24 IST2025-10-09T16:24:14+5:302025-10-09T16:24:27+5:30
वीस वर्षांपासून नाही मिळाला जमिनीचा मोबदला

Sangli: भू-संपादनाचा मोबदला मिळाला नाही, पुणदी-जुनेखेड नदी पुलाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांनी केला बंद
किर्लोस्करवाडी : पलूस आणि वाळवा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुणदी-जुने खेड नदीवरील पुलाला अठरा वर्षे पूर्ण झाली. मात्र या पुलाच्या उत्तरेकडील बाजूने जाणाऱ्या रस्त्यासाठी सक्तीने केलेल्या भू संपादनाचा आजअखेर मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे तीस शेतकऱ्यांनी हा रस्ता गेल्या पाच सहा महिन्यांपासून बंद केला आहे.
दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी २००७ साली या पुलाचे उद्घाटन करून वाळवा आणि पलूस या दोन तालुक्यांना जोडायचे काम केले होते. यामुळे पलूस तालुक्यातील लोकांना वाळवा, इस्लामपूर या ठिकाणी जाण्यासाठी व तिकडच्या लोकांना इकडे येण्यासाठी सोय झाली होती. तसेच यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत झाली. मात्र, संबंधित पुलाच्या उत्तरेकडून २५ शेतकऱ्यांच्या एकत्रित पाच ते सहा एकर जमिनीचे सक्तीने भू संपादन केले होते. या शेतकऱ्यांना त्यावेळी तुम्हाला लवकरच मदत देतो असे आश्वासन प्रशासनाने देऊन देखील आजअखेर वीस वर्षे लोटली तरीही एका रुपयाची मदत शेतकऱ्यांना दिली नाही.
हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून बरोबर मधून गेल्याने शेताचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे मशागतीसह सर्वच कामाला त्रास होत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चरी काढून रस्ता बंद केल्याने ऊस वाहतुकीसह इतर मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. तसेच इतर सर्व वाहतूक बंद झाल्याने दळणवळण ठप्प आहे. लवकरात लवकर भरपाई न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशांत दमामे, चैतन्य पाटील, रघुनाथ पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह बाधित सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे.
पुणदी-जुनेखेड नदी पुलाकडे जाणाऱ्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी माझी संपूर्ण २३ गुंठे जमीन गेल्याने मी भूमिहीन झालो आहे. आता मी खायचे काय? आणि जगायचे कसे हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. - मोहन यादव, बाधित शेतकरी.
प्रांताधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित जागेची लवकरच फेर मोजणी करून मूल्यांकनाचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. - धीरज माने, सहायक अभियंता, श्रेणी २, सार्वजनिक बांधकाम विभाग, पलूस.