कोल्हापुरातील पोलिसाच्या चहा दुकानात छापल्या १ कोटीच्या बनावट नोटा, मिरजेत पाचजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 11:42 IST2025-10-11T11:42:08+5:302025-10-11T11:42:38+5:30
टोळीची पाळेमुळे खणून काढणार; कोल्हापूर, मुंबईचे आरोपी; झेरॉक्स मशीन, प्रिंटर, स्कॅनरसह छपाईचे साहित्य जप्त.

कोल्हापुरातील पोलिसाच्या चहा दुकानात छापल्या १ कोटीच्या बनावट नोटा, मिरजेत पाचजणांना अटक
मिरज : मिरजेत एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करून कोल्हापुरातील पोलिस हवालदारासह पाचजणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५०० व २०० रुपयांच्या १ कोटी किमतीच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर प्रिंटर, वाहन असा एक कोटी अकरा लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी शुक्रवारी मिरजेतील पत्रकार परिषदेत दिली. या सर्व नोटांची छपाई कोल्हापुरातील पोलिस हवालदाराच्या चहाच्या दुकानात झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
बनावट चलनी नोटांवर पश्चिम महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी मुख्य सुत्रधार असलेला पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार (वय ४४, अंबी गल्ली, रा. कसबा बावडा, जि. कोल्हापूर), सुप्रीत काडापा देसाई (रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (वय ३३, लोकमान्य नगर कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, वनश्री अपार्टमेंट रा. टाकाळा, राजारामपुरी कोल्हापूर), सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, रिद्ध गार्डन, एसके वैद्य मार्ग रा. मालाड पूर्व, मुंबई) या पाचजणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने दि. १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
वाचा- तुरुंगात मिळाले पैसा छापण्याचे ज्ञान अन् पोलिसाच्या मदतीने थाटले दुकान
मिरजेत दि. ८ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर रस्त्यावर नीलजी बामणी येथे पुलाखाली एकजण बनावट नोटा विक्रीसाठी आल्याची माहिती गांधी चौक पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून सुप्रीत काडापा देसाई यास ४२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. देसाई याच्याकडे चौकशी केली असता कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार इब्रार आदम इनामदार याच्या कसबा बावडा येथे असलेल्या सिद्धकला चहा या दुकानात कलर झेरॉक्स मशीनवर बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. इनामदार याच्या दुकानातून कलर झेरॉक्स मशीन, नोटा मोजण्याचे मशीन, स्कॅनर, प्रिंटर जप्त करण्यात आले.
सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे, सिद्धेश म्हात्रे या चार जणांमार्फत इब्रार इनामदार हा बनावट नोटा वितरण करत होता. इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात वाहनचालक म्हणून काम करत असून, त्याच्यावर कारवाईचा अहवाल कोल्हापूर पोलिसांना पाठवण्यात आल्याचे घुगे यांनी सांगितले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते.
नोटा कोणाला देणार होते?
संशयित सुप्रीत देसाई हा मिरजेत या नोटा कोणास देण्यासाठी आला होता, याचा तपास सुरू आहे. जे या रॅकेटमध्ये असतील त्या सर्वांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
टोळीची पाळेमुळे खणून काढणार
पाचशे रुपयांच्या एका खऱ्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्यात येत होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटांवर कारवाई करणाऱ्या गांधी चौक पोलिसांना पारितोषिक देण्यात येणार असून, या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यात येतील, असे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईने खळबळ
एकीकडे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू असताना राजकीय हालचालीही गतिमान झाल्या आहेत. याच काळात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकांपूर्वी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या नोटांचे वितरण, त्याचे खरेदीदार यांचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.