Sangli: कवठे एकंदला शोभेच्या दारुचे काम करताना स्फोट, सहाजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:39 IST2025-09-29T16:38:40+5:302025-09-29T16:39:04+5:30
जखमींना उपचारार्थ सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

Sangli: कवठे एकंदला शोभेच्या दारुचे काम करताना स्फोट, सहाजण जखमी
तासगाव : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील सुतारगल्ली परिसरात शोभेच्या दारूचे काम करत असताना दारूचा स्फोट झाल्यामुळे सहाजण जखमी झाले. रविवारी (दि.२८) ही घटना घडली असून जखमीपैकी एकजण गंभीर जखमी असून पाच जणांना किरकोळ भाजले आहे. घटनास्थळी तासगाव पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
कवठे एकंद येथे दसऱ्यानिमित्त शोभेचे दारूकाम करण्याची प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर शोभेचे दारूकाम करण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. रविवारी दुपारी सुतारगल्ली परिसरात सार्वजनिक मंडळाकडून शोभेचे दारूकाम बनवण्याचे काम सुरू होते. शोभेचे दारूकाम करत असताना झालेल्या स्फोटातील आशुतोष बाळासाहेब पाटील (वय १६) हा एक गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तर आनंद नारायण यादव (वय ५५), विवेक आनंदराव पाटील (वय ३८), गजानन शिवाजी यादव (वय २९), अंकुश शामराव घोडके (वय २९), प्रणव रवींद्र आराध्ये (वय २२), ओमकार रवींद्र सुतार (वय २९) हे किरकोळ जखमी आहेत. जखमींना उपचारार्थ सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास तासगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे.