Sangli: ताकारीचे दुसरे आवर्तन सुरू होऊनही लाभक्षेत्रातील शेतात पाण्याचा थेंबही नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:18 IST2026-03-13T19:17:42+5:302026-03-13T19:18:00+5:30
शेतकऱ्यांमधून संताप

संग्रहित छाया
मोहन मोहिते
वांगी : वांगी (ता. कडेगाव) परिसरातील ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या वितरिका क्रमांक ११ वरील बंदिस्त जलवाहिनीचे काम अर्धवट ठेवून अधिकारी व ठेकेदारांनी अक्षरशः शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे. परिणामी, या वितरिकेवर अवलंबून असलेल्या शेतीला यंदाच्या हंगामात पाणीच मिळाले नसून पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पहिल्या आवर्तनात पाणी मिळाले नाहीच, तर दुसरे आवर्तन सुरू होऊन दहा-बारा दिवस उलटूनही पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी ताकारी योजनेच्या वांगी येथील कार्यालयाला कुलूप ठोकत तीव्र निषेध नोंदवला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी तात्पुरती आश्वासने देत शेतकऱ्यांना कुलूप काढण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात मात्र कामाची गती वाढलेली नसून परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
सुमारे तीन किलोमीटर लांबीची ही वितरिका पूर्वी उघडी होती. योजना सुरू झाल्यापासून या वितरिकेमधून परिसरातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत होते. उघड्या वितरिकेमुळे लाभक्षेत्रातील विहिरी व कुपनलिकांची पाणीपातळी वाढून पिकांना मोठा आधार मिळत होता. मात्र पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने बंदिस्त वितरण प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून येथे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.
दरम्यान, वितरिका क्र. ११ वरील जलवाहिनीचे काम अपूर्ण असतानाच उघडी वितरिका बुजवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नोव्हेंबरमध्ये सोडलेले पाणी या परिसरातील शेतांपर्यंत पोहोचलेच नाही. पुढील आवर्तनापूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वाहिनी जोडणीचे काम आजही अपूर्ण आहे. त्यामुळे ताकारीचे पाणी सुरू असूनही ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नाही.
या प्रकारामुळे अधिकारी व ठेकेदार यांच्यात जबाबदारी ढकलण्याचा प्रकार सुरू आहे. अधिकारी ठेकेदाराकडे बोट दाखवत आहेत, तर ठेकेदार ‘काम सुरू आहे’ असा दिखावा करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. उघडी वितरिका बुजवून जलवाहिनीचे काम अर्धवट सोडल्याने संपूर्ण लाभक्षेत्रातील शेती संकटात सापडली आहे.
या पोटपाटावरील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. अधिकारी व ठेकेदार यांना तातडीने दोन दिवसात पोटपाटाला पाणी दिले नाही तर वांगी येथील कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करू. - दत्तात्रय चव्हाण, अध्यक्ष, पाणी वापर संस्था