Sangli-Local Body Election: कवठेमहांकाळमध्ये समीकरणे बदलणार, घोरपडे गट महायुतीत जाण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:22 IST2025-11-21T19:22:01+5:302025-11-21T19:22:51+5:30
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sangli-Local Body Election: कवठेमहांकाळमध्ये समीकरणे बदलणार, घोरपडे गट महायुतीत जाण्याची चिन्हे
कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागताच कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने तालुक्यात नवी राजकीय दिशा देणाऱ्या हालचाली सुरू केल्या असून, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि युवानेते राजवर्धन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण रणनीती बैठक पार पडली.
घोरपडे महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र, हा प्रश्न काही दिवसांपासून चर्चेत होता. अखेर या बैठकीत ‘आगामी निवडणूक आम्ही महायुतीसोबत-विशेषतः भाजप आणि इतर मित्रपक्षांना घेऊनच लढणार,’ असा ठाम संदेश अजितराव घोरपडे यांनी देत राजकीय घडामोडींना नवी कलाटणी देणारा ठरणार आहे.
बैठकीत तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांचे गावनिहाय सखोल विश्लेषण करण्यात आले. इच्छुक उमेदवारांची स्वतंत्र मुलाखत घेण्यात आली असून, काही गटांत अपेक्षेपेक्षा अधिक इच्छुक आल्याने स्पर्धा चुरशीची होणार आहे. बूथरचना, सोशल मीडिया रणनीती, ग्रामसभा, तरुण व महिला मतदारांपर्यंत पोहोच, तसेच राज्य सरकारच्या विकासकामांची प्रभावी मांडणी अशा विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राजकीय सूत्रांच्या मते, ही फक्त इच्छुकांची झडती नसून संपूर्ण संघटनात्मक पुनर्रचना असल्याचे संकेत मिळत आहेत. घोरपडे यांच्या भूमिकेमुळे महायुतीचा संभाव्य संयुक्त मोर्चा उभा राहण्याची शक्यता वाढली असून, तालुक्याच्या निवडणूक समीकरणात मोठे बदल होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.