आठजणांची जामिनासाठी धाव

By Admin | Updated: December 20, 2015 00:35 IST2015-12-20T00:35:41+5:302015-12-20T00:35:41+5:30

आरोग्यसेविका पेपरफुटी प्रकरण : ३ जानेवारीला होणार सुनावणी

The eight run for bail | आठजणांची जामिनासाठी धाव

आठजणांची जामिनासाठी धाव

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पेपर फुटीप्रकरणी आठजणांनी शनिवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यावर येत्या ३ जानेवारीला सुनावणी होणार आहे. यापूर्वीही संजय कांबळे याने जामिनासाठी धाव घेतली आहे.
किरण वसंतराव कदम (वय ४५, रा. शाहूनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ), इंदुताई बाबूराव पांढरे (३६, सावळी, ता. मिरज), शीतल कल्लाप्पा मुगूलखोडे (४८, मालगाव, ता. मिरज), ज्योत्स्ना प्रकाश भुरुटे (३१, शेगाव, ता. जत), मंदार मोहन कोरे (२७, हरिपूर, ता. मिरज), शुभांगी प्रकाश पाटील (३२, करोली-एम, ता. मिरज), सुकेशिनी प्रकाश थोरात (३०, सोनी, ता. मिरज) व अलका दिलीप माने (४६, भोसे, ता. मिरज) अशी जामिनासाठी धाव घेतलेल्यांची नावे आहेत. या आठ जणांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात व्यवसाय नोकरी असा उल्लेख केला आहे. पण हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत, का परीक्षेला बसलेले उमेदवार, याची माहिती मिळू शकली नाही.
गेल्या महिन्यात पेपरफुटीचे हे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेविका शाहीन जमादार व शाकीरा उमराणी या दोघींना अटक केली होती. न्यायालयाकडून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. तेव्हापासून पोलिसांनी एकाही संशयितास नव्याने अटक केली नाही. त्यावेळी तिसरा संशयित म्हणून संजय कांबळे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पण पोलिसांनी प्रसारमाध्यमांपासून ही माहिती लपविली होती. त्यामुळे कांबळेने अटकेची कारवाई टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. त्यावर आता २८ डिसेंबरला अंतिम सुनावणी होणार आहे.
पोलिसांकडून तपासात दिरंगाई होत असल्याची चर्चा सुरु आहे. तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे (एलसीबी) सोपविला होता. पण लगेच काढूनही घेण्यात आला होता. याचीही आता उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The eight run for bail