Sangli-Local Body Election: तडीपार, मोक्यात अडकलेल्यांना थारा देऊ नका - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:22 IST2025-11-17T19:21:19+5:302025-11-17T19:22:14+5:30
Local Body Election: नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sangli-Local Body Election: तडीपार, मोक्यात अडकलेल्यांना थारा देऊ नका - जयंत पाटील
ईश्वरपूर : तडीपार आणि मोकासारख्या गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आलेले गुंड, गुन्हेगार शहरात राजरोस फिरत आहेत. हेच गुंड तुमच्याकडे मते मागायला येऊ शकतात. मात्र शहरातील सुज्ञ जनता हे शहर गुंडांच्या ताब्यात देणार नाही, याचा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.
उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेत आमदार पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, परवा पालकमंत्री आपल्या शहरात येऊन गेले. ते म्हणतात आमच्या लोकांना निवडून द्या,आम्ही या शहरातील भुयारी गटारी,२४ तास पाणी,रस्ते आदी विकास कामे मार्गी लावू. गेल्या ९ वर्षात तुमचीच सत्ता आहे, मग ही विकास कामे का केली नाहीत? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
उषोषण केल्यानंतरच इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले, मात्र शहराच्या नावात उरूणचा समावेश झालेला नाही. त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. आनंदराव मलगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी खंडेराव जाधव, डॉ.संग्राम पाटील, बी.ए.पाटील, ॲड. धैर्यशिल पाटील, रणजित मंत्री, अरुण कांबळे,रोझा किणीकर, धनंजय कुलकर्णी, शंकरराव पाटील, संजय पाटील(धनी), पिरअली पुणेकर, अशोक उरूणकर, अनिल पावणे, दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले. शैलेश पाटील यांनी सूत्र संचालन केले.