Sangli: म्हैसाळ सिंचन योजनेसाठी वारणा धरणातून विसर्ग वाढवला, किती टीएमसी पाणीसाठा झाला कमी..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:03 IST2026-03-06T18:59:45+5:302026-03-06T19:03:18+5:30
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील एमआयडीसी क्षेत्रांना सातत्याने पाणीपुरवठा करून उद्योगांना गती देण्याचे काम वारणा धरणाने केले

संग्रहित छाया
विकास शहा
शिराळा : वारणा धरणातून वाकुर्डे बुद्रुक योजना, कालव्यावरील उपसा जलसिंचन योजना आणि आता म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ८.७५ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. या धरणातून सध्या १९५० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यातील १७०० क्युसेक नदीपात्रात तर २५० क्युसेकने पाणी डाव्या कालव्यात सोडण्यात आले आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील एमआयडीसी क्षेत्रांना सातत्याने पाणीपुरवठा करून उद्योगांना गती देण्याचे काम वारणा धरणाने केले आहे. मराठवाड्यासाठी ''जलदूत'' रेल्वेचा प्रवास मराठवाड्यात (विशेषतः लातूरमध्ये) जेव्हा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती, तेव्हा वारणा आणि कृष्णा खोऱ्यातील पाण्यानेच या भागाला वाचवले होते. २०१६ च्या सुमारास जेव्हा लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा होता, तेव्हा मिरज (सांगली) येथून ''जलदूत एक्स्प्रेस'' नावाने रेल्वेने पाणी पाठविण्यात आली होते.
यावर्षी वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी २ जानेवारी ते २९ जानेवारीदरम्यान पाणी सोडण्यात आले होते तर ११ फेब्रुवारीपासून डाव्या कालव्यावरील जलसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्यात आले आहे. याबरोबरच शनिवारी (दि. २१) सकाळी साडेअकरा वाजता म्हैसाळ योजनेची मागणी असल्याने वारणा नदीमध्ये ९०० क्युसेक विसर्ग वाढवून १२०० क्युसेक इतका करण्यात आला होता.
आणखी म्हैसाळ योजनेची मागणी वाढल्याने गुरुवारी (दि. ५) दुपारी साडेपाच वाजता नदीपात्रात १७०० क्युसेक तर २५० क्युसेकने डाव्या कालव्यावरील जलसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्यात आले आहे. सध्या या धरणात २५.७१ टीएमसी (७४.७४%) पाणीसाठा असून १८.८३ (६८.४२%) टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.