Sangli ZP: भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीत मतभेद, मुंबईतील बैठकीला नेत्यांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:21 IST2026-03-07T12:20:54+5:302026-03-07T12:21:29+5:30
गटनेता नोंदणीचे पत्र प्रशासनाने नाकारले

Sangli ZP: भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीत मतभेद, मुंबईतील बैठकीला नेत्यांची दांडी
सांगली : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पाठिंब्याच्या निर्णयावर चर्चेसाठी पक्षाच्या वरिष्ठांनी शुक्रवारी मुंबईत बैठक बोलवली होती. मात्र, पक्षाचे जिल्हाध्यक्ष वगळता अन्य नेते गेलेच नाहीत. त्यामुळे पक्षनेतृत्व आणि स्थानिक नेत्यांमधील धुसफुस स्पष्ट झाली आहे. दरम्यान, गटनेता म्हणून राजेश्वरी नाईक यांच्या नावावर शुक्रवारीही प्रशासकीय शिक्कामोर्तब होऊ शकली नाही.
आठवडाभरापूर्वी झालेल्या पक्ष बैठकीत सदस्या राजेश्वरी रणधीर नाईक यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. त्याचे पत्र देण्यासाठी पक्षनेते दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहेत. मात्र, प्रशासनाने तांत्रिक त्रुटी सांगत पत्र स्वीकारले नसल्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले. शुक्रवारी नेेतेमंडळी पत्र देण्यासाठी उशिरापर्यंत थांबून होती. मात्र, त्यांना परत फिरावे लागले. आता शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी पत्र द्यावे लागणार आहे.
दरम्यान, मुंबईतील बैठकीलाही जिल्ह्यातील नेते गेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी बैठक बोलवली होती, पण नेत्यांनी त्याकडे पाठ फिरविली.
तुम्ही म्हणताय म्हणून पाठिंबा नाही!
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राज्य नेतृत्वाकडून जिल्हा परिषदेत भाजपला पाठिंबा दिला जावा, यासाठी सांगितले जात आहे. मात्र, स्थानिक नेतृत्व वरिष्ठांच्या सूचनेशी सहमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शुक्रवारच्या मुंबईतील बैठकीकडे नेत्यांनी पाठ फिरविली. माजी मंत्री अजितराव घोरपडे, विलासराव जगताप आदींनी मुंबईच्या बैठकीकडे पाठ फिरविली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार) गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांचे नाव आम्ही निश्चित केले आहे. त्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आम्ही गुरुवारी व शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. मात्र, तांत्रिक त्रुटी काढत पत्र घेण्यात आले नाही. आम्हाला परत पाठविण्यात आले. प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असून, गटनोंदणीस टाळाटाळ केली जात आहे. - विलासराव जगताप, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार).