एक हजाराची लाच घेताना आष्ट्यातील नायब तहसीलदार, लिपिक एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:24 IST2022-02-22T17:24:10+5:302022-02-22T17:24:38+5:30
सातबारा उताऱ्यावर नावात बदल करण्यासाठी केली लाचेची मागणी

एक हजाराची लाच घेताना आष्ट्यातील नायब तहसीलदार, लिपिक एसीबीच्या जाळ्यात
आष्टा : सातबारा उताऱ्यावर नावात बदल करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना आष्टा येथील अतिरिक्त तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व लिपिकास रंगेहात पकडले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
नायब तहसीलदार बाजीराव राजाराम पाटील (वय ५२ रा. अशोकराज निवास, ता शिराळा, जि. सांगली) व लिपिक सुधीर दीपक तमायचे (३७ रा. शांतीनगर, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी या दोघांची नावे आहेत. एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोटखिंडी ता. वाळवा येथील एका शेतकऱ्याने सातबारा उताऱ्यावर नावात बदल करून मिळण्याबाबत अप्पर तहसीलदार कार्यालय आष्टा यांच्याकडे अर्ज केला होता. नावामध्ये बदल करून देण्याच्या कामांमध्ये प्रकरण सही करून तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी नायब तहसीलदार बाजीराव पाटील व लिपिक सुधीर तमायचे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
याबाबत संबंधित शेतकऱ्याने सांगली लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. दरम्यान आज, सकाळच्या दरम्यान संबंधित शेतकरी व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी नायब तहसीलदार बाजीराव पाटील व लिपिक सुधीर तमायचे याच्याकडे गेले असता त्यांनी एक हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम स्विकारताना या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली.
या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, सीमा माने, संजय कलगुटगी, भास्कर भोरे, सलीम मकानदार, रवींद्र धुमाळ, राधिका माने व बाळासाहेब पवार यांनी कारवाई केली.