चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 18:15 IST2022-09-15T17:52:14+5:302022-09-15T18:15:01+5:30
पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून कोणत्याही क्षणी वक्राकार दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येणार

चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट
गंगाराम पाटील
वारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे आज, गुरूवारी दुपारी चार वाजता धरणाचे वक्राकार दरवाजे बंद करण्यात आले. मात्र जलविद्युत केंद्राकडून १५६३ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल, बुधवार ते आज, गुरुवारपर्यंत एकूण २६६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १५६३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तेवढाच विसर्ग जलविद्युत केंद्राकडून सुरू आहे. धरणात सध्या ३४.१२ टीएमसी असून त्याची टक्केवारी ९९.१७ अशी आहे. पाणी पातळी ६२६.६० मिटर आहे.
धरणाच्या वक्राकार दरवाजातून विसर्ग पूर्ण पणे बंद केल्याने वारणा नदीचे पाणी पातळीत घट झाली आहे. पण पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून कोणत्याही क्षणी वक्राकार दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता गोरख पाटील यांनी सांगितले.