Sangli News: पिकांना पाण्याची गरज, टेंभू योजनेचे उद्या आवर्तन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:21 IST2025-12-31T19:20:39+5:302025-12-31T19:21:13+5:30
वाघोली वड येथील बैठकीत माहिती

संग्रहित छाया
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ-तासगाव तालुक्यांसाठी टेंभू योजनेचे एक जानेवारीला आणि म्हैसाळ पाणी योजनेचे १० जानेवारीला आवर्तन सुरू करण्यात येईल, अशी माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.
वाघोली वड (ता. कवठेमहांकाळ) येथे टेंभू व म्हैसाळ पाणी योजनेचे अधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आतापासूनच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याने अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे नियोजन करावे. एक जानेवारीला तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करावे, तसेच दहा जानेवारीपर्यंत म्हैसाळ पाणी योजना सुरू करावी, अशी सूचना आमदार रोहित पाटील यांनी केली.
टेंभू व म्हैसाळ योजनेवरील कामे सुरू आहेत. ही कामे आम्ही लवकर पूर्ण करू, असे आश्वासन अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिले. टेंभू योजनेची अनेक ठिकाणी गळती आहे, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्यानंतर रोहित पाटील यांनी त्वरित गळती काढावी आणि पाणी येण्याचा मार्ग सुकर करावा, अशा सूचना दिल्या.
या बैठकीला विश्वास पाटील, ताजुद्दीन तांबोळी, संजय पाटील, महेश पवार, दादासाहेब कोळेकर, महेश पाटील, संजय वाघमारे, जनार्दन देसाई, अर्जुन गेंड, नितीन पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, कुमार पाटील, पांडुरंग यमगर, युवराज पाटील, बाळासाहेब पाटील, भानुदास पाटील, बापूसाहेब तंगडे, अमर शिंदे, वामन कदम, सुशांत शिंदेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बांधापर्यंत पाणी द्यावे
अनेक गावांमध्ये टेंभूचे पाणी कमी दाबाने येते, अशा तक्रारी केल्यावर रोहित पाटील यांनी पाण्याचा उच्च दाबाने कसे येईल आणि पाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कसे मिळेल, याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता बाळगावी. काही गावांमध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळत नाही, अशा तक्रारी केल्यानंतर रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी बांधापर्यंत पाणी द्यावे द्यावे, असे राेहित पाटील म्हणाले.