Sangli: १२ कोटींच्या जीएसटी घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:34 IST2025-10-17T11:33:17+5:302025-10-17T11:34:56+5:30
केंद्रीय जीएसटी विभागाकडून कारवाईच्या हालचाली

Sangli: १२ कोटींच्या जीएसटी घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल होणार
सांगली : पलूसच्या पत्त्यावर दिल्लीतील एका व्यापाऱ्याने बोगस फर्म काढून १२ कोटींची करचुकवेगिरी केल्याचे प्रकरण बुधवारी उजेडात आले होते. याप्रकरणी फौजदारी कारवाईच्या हालचाली केंद्रीय जीएसटी विभागाकडून सुरू आहेत. या फर्मच्या कर सल्लागारालाही विभागाने जबाबदार धरले असून तोही विभागाच्या ‘रडार’वर आला आहे.
दिल्ली येथील गोविंद सिंग नामक व्यक्तीने पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील पत्त्यावर मेटल फर्मची जीएसटी नोंदणी केल्याचे व बोगस बिलांद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस बिलांसंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर विभागाच्या अन्वेषण शाखेने रामानंदनगर येथे अचानक तपासणी केली. मात्र, प्रत्यक्ष पत्त्यावर कोणतीही फर्म अस्तित्वात नसल्याचे तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
तपासात हे स्पष्ट झाले की, संबंधित फर्मने १२ कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी चलनांची निर्मिती करून ती पुढे सादर केली. त्यामुळे संशयाच्या आधारे या चलनांची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टींची छाननी केल्यानंतर या बनावट नोंदणीमागील मुख्य सूत्रधार दिल्लीतील गोविंद सिंग असल्याची माहिती पुढे आली.
आवश्यक सर्व माहिती घेतल्यानंतर आता मुख्य सूत्रधारासह अन्य सहभागी लोकांचा शोध घेतला जात असून यात फौजदारी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कर चुकवेगिरी प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे.
इस्लामपूरच्या प्रकरणात कागदपत्रांची तपासणी
इस्लामपूर शहराच्या लाल चौक परिसरातील बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याच्या घरावर बुधवारी दुपारी केंद्रीय गुप्तचर महासंचालनालय, कोल्हापूर शाखेचे अधिकारी (डीजीजीआय) पथकाने छापा टाकला होता. याठिकाणची कागदपत्रे ताब्यात घेतली असली तरी पुढील कारवाईबाबत तपासणी पथकाने गोपनीयता बाळगली आहे.