Sangli Crime: कुपवाडमध्ये गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने निर्घृण खून, शोधासाठी पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:33 IST2025-05-27T13:33:17+5:302025-05-27T13:33:17+5:30

खुनाचे कारण अस्पष्ट

Criminal brutally murdered with sharp weapon in Kupwad Sangli, teams sent for search | Sangli Crime: कुपवाडमध्ये गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने निर्घृण खून, शोधासाठी पथके रवाना

Sangli Crime: कुपवाडमध्ये गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने निर्घृण खून, शोधासाठी पथके रवाना

कुपवाड : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रावणेशनाथ महावीर चौगुले (वय २९, रा. सध्या रा. सिद्धिविनायक पार्क, शिवशक्तीनगर कुपवाड, मूळ रा. भोसे, ता. मिरज) याचा रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील शिवशक्तीनगरमध्ये भाड्याच्या खोलीत दोन मित्रांनी निर्घृण खून केला. याबाबतची फिर्याद चौगुले याच्या नातेवाइकांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी सोफ्या व अशोक मोरे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या दोन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसे (ता. मिरज) येथील श्रावणेशनाथ चौगुले हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो गेल्या आठ महिन्यांपासून मिरज एमआयडीसीलगत असलेल्या शिवशक्तीनगरमध्ये सचिन माने यांच्या खोलीत भाड्याने एकटाच राहत होता. दोन मित्रांनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात कारणावरून श्रावणेशनाथ चौगुले याच्या छातीवर, डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून खून केला.

रविवारी रात्री उशिरा हा प्रकार निदर्शनास आला. कुपवाड पोलिसांना माहिती मिळताच सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर आणि पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे आणि पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस अधीक्षक घुगे यांनी संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या. मृत चौगुले याच्या नातेवाईकांना हा प्रकार कळवताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा फिर्याद नोंदवली.

दोन पथके मागावर

सोफ्या व अशोक या दोन आरोपींची नावे प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहेत. दोघांच्या शोधासाठी कुपवाड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पथके रवाना झाली आहेत. मृत श्रावणेशनाथ चौगुले याच्या विरोधात जत आणि मिरज पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

खुनाचे कारण अस्पष्ट

श्रावणेशनाथ याच्या खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. संशयित दोघेजण त्याचे मित्र आहेत. दोघांना अटक केल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Criminal brutally murdered with sharp weapon in Kupwad Sangli, teams sent for search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.