Sangli Crime: बालकाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याचा पोलिसांना चकवा, रत्नागिरी जिल्ह्यात केली होती बाळाची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:20 IST2025-10-28T18:20:11+5:302025-10-28T18:20:37+5:30
मुख्य सूत्रधार इम्तियाजचा पोलिसांनी थरारक पाठलाग केला. परंतु, तो पसार झाला

Sangli Crime: बालकाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याचा पोलिसांना चकवा, रत्नागिरी जिल्ह्यात केली होती बाळाची विक्री
सांगली : राजस्थानी कुटुंबातील एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीतील इम्तियाज पठाण, वसीमा इम्तियाज पठाण (रा. मिरज) हे दाम्पत्य अद्याप पसार आहे. दोघेही पोलिस पथकाला चकवा देत फिरत आहेत. तर अटकेत असलेला इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज) हा पोलिस कोठडीत आहे.
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून सांगलीत येऊन फुगे विक्री करणाऱ्या कुटुंबातील एक वर्षाचे बाळ दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास तिघांनी पळविल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. दिवाळीचा सण सोडून स्थानिक गुन्हे अन्वेषणसह विश्रामबाग पोलिसांचे पथक टोळीच्या मागावर होते. बाळाचे अपहरण झाल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेऊन पोलिस तपासात गुंतले होते. अखेर पोलिसांनी टोळीपर्यंत माग काढण्यात यश मिळवले. तिघांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील कुटुंबाला बाळाची विक्री केली होती. सुमारे अडीच लाखांचा सौदा ठरला होता. त्यापैकी १ लाख ८० हजार रुपये घेतले होते.
पोलिसांनी टोळीचा छडा लावल्यानंतर इनायत गोलंदाज याला पकडण्यात यश मिळाले. तर इम्तियाज पठाण हा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला. इम्तियाज हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चार-पाच दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत आहे. गुन्हे अन्वेषणच्या पथकासह विश्रामबाग पोलिस त्याच्या मागावर आहेत. लवकरच तो सापडेल, असा विश्वास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी व्यक्त केला आहे.
इम्तियाजचा थरारक पाठलाग
इम्तियाज हा बालक अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. मिरज पोलिसांना याचा प्रथम सुगावा लागला. तोपर्यंत गुन्हे अन्वेषण व विश्रामबाग पोलिसही त्याच्यापर्यंत पोहोचले. परंतु, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे त्याने पोलिसांना गुंगारा दिला. त्याचा ठावठिकाणा समजल्यानंतर पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग केला. परंतु, तो पसार झाला. दरम्यान, त्याला कोणत्याही परिस्थितीत पकडण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे.