Sangli Crime: प्रेम विवाहाच्या रागातून मिरजेत दाम्पत्यास बेदम मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:43 IST2026-02-13T15:42:28+5:302026-02-13T15:43:04+5:30
मिरज : प्रेम विवाह केल्याच्या रागातून मिरजेतील सुभाषनगर येथील तरुणास व त्याच्या पत्नीस मेव्हणा, सासू व त्यांच्या साथीदारांनी बेदम ...

संग्रहित छाया
मिरज : प्रेम विवाह केल्याच्या रागातून मिरजेतील सुभाषनगर येथील तरुणास व त्याच्या पत्नीस मेव्हणा, सासू व त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश नवनाथ लोंढे (वय ३६, रा. मदिना मशिद शेजारी, सुभाषनगर, मिरज) हा मारहाणीत जखमी झाला आहे. संदेश व त्यांची पत्नी आश्विनी यांनी प्रेम विवाह केल्याच्या रागातून अश्विनीचा भाऊ आकाश बाळू सदामस्त याने मोबाइलवरून संदेश यास शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर संदेश व आश्विनी घरी असताना आरोपी आकाश बाळू सदामस्त, आशिष बाळू सदामस्त, सुनीता बाळू सदामस्त (रा. शामरावनगर, सांगली), किशोर गणपती कट्टे, अंशू किशोर कट्टे व सुजल किशोर कट्टे (रा. आंबेडकरनगर, सांगली) यांनी घरात घुसून संदेश यास लाथाबुक्यांनी मारहाण केली.
आकाश सदामस्त याने प्लास्टिकची बादली कमरेवर मारली, आशिष सदामस्त याने घरातील काचेचा आरसा डोक्यात मारून गंभीर जखमी केले. किशोर व सुजल कट्टे यांनीही संदेश यास तोंडावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. पतीला सोडवण्यासाठी पत्नी आश्विनी धावून आली असता तिला आई सुनीता सदामस्त, पूजा सदामस्त व अंशु कट्टे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.