गृहोद्योगाचे आमिष; सांगली, कोल्हापुरातील महिलांना ८५ लाखांचा गंडा घालणारे जोडपे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:38 IST2025-03-12T16:37:38+5:302025-03-12T16:38:11+5:30
सांगली : गृहोद्योगाच्या आमिषाने सुमारे १८०० महिलांची ८६ लाखांची फसवणूक करणाऱ्या जोडप्याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. गेल्या डिसेंबर महिन्यांपासून ...

गृहोद्योगाचे आमिष; सांगली, कोल्हापुरातील महिलांना ८५ लाखांचा गंडा घालणारे जोडपे ताब्यात
सांगली : गृहोद्योगाच्या आमिषाने सुमारे १८०० महिलांची ८६ लाखांची फसवणूक करणाऱ्या जोडप्याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. गेल्या डिसेंबर महिन्यांपासून त्यांचा शोध सुरू होता.
लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर आणि कविता राजकुमार शिंदे ऊर्फ कविता लक्ष्मण बंडगर (मूळ मु.पो. कास्तीखुर्द, ता. लोहारा. जि. धाराशिव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात २१ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. चंद्रकांत महादेव कडोले (वय ५९, रा. प्रगती कॉलनी, १०० फुटी रस्ता, सांगली) यांनी तक्रार दिली होती. ३ जानेवारी ते १४ जुलै २०२४ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला होता.
या जोडप्याने सांगलीत १०० फुटी रस्त्यावर रामकृष्ण परमहंस सोसायटीत गुरुकृपा महिला गृहोद्योग सुरू केला होता. या उद्योगात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून महिलांनी पैसे गुंतविले होते. या दोघा संशयितांनी सांगली, मिरज, पलूस, तासगाव, कोल्हापूरमध्ये जाऊन महिलांना आमिष दाखविले होते. उद्योगात सभासद होण्यासाठी प्रत्येक महिलेकडून १० ते १५ हजार रुपये घेतले. ही रक्कम ठेव म्हणून स्वीकारली. त्या मोबदल्यात महिलांना चटणी पॅकिंगचे काम दिले. मजुरी म्हणून प्रत्येक १० किलो पॅकिंगसाठी दर आठवड्याला १२०० रुपये मोबदला दिला.
जानेवारी ते जुलै या कालावधीत सुमारे १८०० महिलांना सभासद करून घेतले. सुरुवातीला मजुरी नियमितपणे दिली व काही दिवसांनी आणखी परतावा मिळेल असे सांगितले. त्याचबरोबर या महिलांना सभासद करून घेतले. त्यांच्याकडूनही ठेवीचे पैसे घेतले. त्यानंतर गुरुकृपा गृहोद्योग बंद करून दोघेही गायब झाले. या सर्व महिलांची सुमारे ८६ लाख २८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. यातील लक्ष्मण बंडगर याला अटक केली असून, कविता बंडगर हिला प्रतिबंधात्मक नोटीस दिली आहे. ही कारवाई निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल पोवार, महादेव घेरडे, सुनील पाटील, विजय पाटणकर यांनी केली.
पुण्यातून मंगळवेढ्यात पळाले
या जोडप्याविरोधात फिर्याद दाखल होताच विश्रामबाग पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. गेले तीन महिने ते पोलिसांना गुंगारा देत होते. दोघे पुण्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली, तोपर्यंत ते तेथूनही गायब झाले होते. तपासाअंती मंगळवेढ्याला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्या मोबाइल लोकेशनद्वारे माग काढत मंगळवेढ्यात दोघांनाही ताब्यात घेतले.