Coronavirus In Sangli: कडेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; भिकवडीत १० वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 10:11 IST2020-05-15T10:11:33+5:302020-05-15T10:11:51+5:30
अहमदाबाद (गुजरात) येथून खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथे आलेल्या महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी (ता.४ )रोजी येथे आले होते.

Coronavirus In Sangli: कडेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; भिकवडीत १० वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह
कडेगाव - सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून साळशिंगे (ता. खानापूर) येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द (ता. कडेगाव) येथील चौघांमधील १० वर्षाच्या मुलगा पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून अन्य तिघांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. यामुळे भिकवडी परिसरासह कडेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अहमदाबाद (गुजरात) येथून खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथे आलेल्या महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी (ता.४ )रोजी येथे आले होते. या चौघांनाही भिकवडी येथे होम क्वारंनटाईन केले होते. यानंतर साळसिंगे येथील महिलेला कोरोना झाल्याचे रविवारी (ता.१० ) रोजी निष्पन्न झाले.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने भिकवडी खुर्द येथील या चौघांनाही सोमवारी (ता.११ ) रोजी होम क्वारंनटाईनमधून कडेगाव येथे संस्थात्मक क्वारंनटाईन केले होते. आता त्यापैकी १० वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान प्रांताधिकारी डॉ.गणेश मरकड,तहसीलदार डॉ. शैलजा पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे ,पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस यांचेसह आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने भिकवडी खुर्द येथे धाव घेवून खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. संबधित कुटुंब रहात असलेल्या परिसरासह गाव सीलबंद केले आहे. आरोग्य विभागाने होम टू होम सर्वे सुरू केला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने गावात निर्जंतुक औषध फवारणी करण्यात येत आहे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
१४ जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात
भिकवडी खुर्द येथील त्या चौघांच्या संपर्कात आलेल्या व गावात होम क्वारंनटाईन केलेल्या १४ जणांना आरोग्य विभागाने आता कडेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आज त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतले जाणार आहेत.