Sangli: पुणे-बेंगळुरु महामार्गावर येलूर फाटानजीक कंटेनर उलटला, तीन तास वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:30 IST2026-02-20T18:29:48+5:302026-02-20T18:30:57+5:30
इतकरे फाटा ते येलूर फाटा दरम्यान घसर असल्याने अवजड वाहनांना या वळणावरून वाहतूक करताना त्रास

Sangli: पुणे-बेंगळुरु महामार्गावर येलूर फाटानजीक कंटेनर उलटला, तीन तास वाहतूक कोंडी
येलूर : पुणे-बेंगळुरु महामार्गावरील येलूर फाट्यावरील एका हॉटेल समोर कंटेनर उलटल्याने सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. काही युवकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
येलूर येथील एका हॉटेलसमोर आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोल्हापूरकडे निघालेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर धडकून मागील बाजूची चाके निघून पडली. यामुळे कंटेनर उलटला. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
रस्त्याचे काम चालू असल्याने या ठिकाणी हॉटेल समोर वळण देऊन वाहतूक सेवा मार्गावरून होत आहे. इतकरे फाटा ते येलूर फाटा दरम्यान घसर असल्याने अवजड वाहनांना या वळणावरून वाहतूक करताना त्रास होत आहे. याच ठिकाणी वारंवार किरकोळ अपघात होत आहेत. याकडे रस्ते विकास कंपनीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आजपासून दहावीचे पेपर सुरू झाल्याने या मार्गावरून निघालेल्या काही शिक्षकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.