सांगलीत काँग्रेसला पुन्हा धक्का; विशाल पाटील समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:45 IST2025-08-11T16:45:01+5:302025-08-11T16:45:35+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देणार काँग्रेस नेत्याच्या निवासस्थानी भेट

Congress suffers setback in Sangli Vishal Patil supporter to join BJP | सांगलीत काँग्रेसला पुन्हा धक्का; विशाल पाटील समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश

संग्रहित छाया

सांगली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर यांचा सोमवार, दि. ११ रोजी भाजप प्रवेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीत मेळावा होणार आहे.

भाजपकडून आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. त्यादृष्टीने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कामाला लागले आहेत. दीड महिन्यापूर्वी काँग्रेस नेत्या व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

त्यानंतर पुन्हा काँग्रेसला धक्का दिला असून, खासदार विशाल पाटील यांचे समर्थक व महापालिकेचे माजी नगरसेवक मनोज सरगर, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, महेश साळुंखे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर, माजी संचालक बाळासाहेब बंडगर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे निवडीनंतर प्रथमच सांगलीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला असल्याचे ‘भाजप’चे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी सांगितले.

रवींद्र चव्हाण देणार काँग्रेस नेत्याच्या निवासस्थानी भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोमवारी सांगली दौऱ्यावर असून, ते आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी देणार आहेत. या भेटीकडे जिल्ह्यातील भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष आहे. या दौऱ्यामध्ये रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील, जिल्ह्यातील सर्व आमदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकाऱ्यांशीही बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

Web Title: Congress suffers setback in Sangli Vishal Patil supporter to join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.