मिरजेत काँग्रेसला धक्का, माजी महापौर किशोर जामदारांसह विविध पक्षातील नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:43 IST2025-12-20T18:42:17+5:302025-12-20T18:43:15+5:30
जातीपातीचे राजकारण करून पोळी भाजणार नाही

मिरजेत काँग्रेसला धक्का, माजी महापौर किशोर जामदारांसह विविध पक्षातील नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश
मिरज : महापालिकेत ज्याची निवडून येण्याची येण्याची क्षमता आहे, अशांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली मिळेल. मतांचे व जातीचे राजकारण करायला, राजकीय पोळी भाजायला मी आलो नाही. माणुसकी महत्त्वाची असते, त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेत राष्ट्रवादी मेळाव्यात सांगितले.
मिरजेत अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते, माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह मिरजेतील माजी नगरसेवक व विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप उत्कर्ष खाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, राज्यातील २९ पैकी चार मोठ्या महापालिका सोडल्या, तर अन्य महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर शहराचा विकास करू शकत नाहीत. अशा महापालिकांना केंद्र, राज्य व अन्य निधी उपलब्ध होईल. शक्तिपीठ महामार्ग तयार करताना जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केलेल्या नेत्यांना आगीतून उठून फुफाट्यात पडलो, असे कधीही वाटणार नाही.
यावेळी माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी, आरीफ चौधरी, अंकुश कोळेकर, शुभांगी देवमाने, नर्गिस सय्यद, मालन हुलवान, श्रीमती रेखा विवेक कांबळे, बिलकिस बुजरूक शेख, चंद्रकांत हुलवान, आजम काझी, शरद जाधव, शकील पिरजादे, तानाजी रुईकर यांच्यासह विविध पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व नाही : किशोर जामदार
काँग्रेस पक्षाने मला भरपूर पदे दिली. मात्र, सध्या काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व नाही, खमक्या नेत्याची उणीव असल्याने शहराच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माजी महापौर किशोर जामदार यांनी सांगितले. तर ज्यांची निवडून येण्याची पात्रता नाही, अशांच्या हातात माजी मंत्री जयंत पाटील यांनी सूत्रे दिल्याने महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी संपल्याची टीका माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी केली.