Local Body Election: सांगली जिल्ह्यातील आठ पैकी सहा पालिकांमध्ये काँग्रेस विना ‘हात’ लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:01 IST2025-11-24T19:00:09+5:302025-11-24T19:01:14+5:30

महायुतीला रोखण्यासाठी माघार

Congress does not have an official candidate in six out of eight municipal council and nagar panchayat elections in Sangli district | Local Body Election: सांगली जिल्ह्यातील आठ पैकी सहा पालिकांमध्ये काँग्रेस विना ‘हात’ लढणार

Local Body Election: सांगली जिल्ह्यातील आठ पैकी सहा पालिकांमध्ये काँग्रेस विना ‘हात’ लढणार

सांगली : जिल्ह्यातील आठपैकी सहा नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नाही. यामुळे या सहा ठिकाणच्या निवडणुकीतून काँग्रेसचे पंजाचे चिन्ह गायब झाले आहे. जत, पलूस नगरपरिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसने मित्र पक्षाच्या मदतीने महायुतीसमोर आव्हान उभा केले आहे. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महायुतीला रोखण्यासाठी आणि मत विभाजन टाळण्यासाठी अर्ज दाखल केले नाही, असे स्पष्ट केले.

जिल्ह्यात उरुण - ईश्वरपूर, आष्टा, जत, तासगाव, विटा, पलूस या सहा नगरपरिषदा आणि शिराळा, आटपाडी या नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचार शिगेला पोहोचला आहे. पलूस आणि जत या दोन नगरपालिकांमध्ये काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला आहे. मात्र, उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली केवळ पाठिंबा दिला आहे.

पलूसमध्ये माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी संजीवनी पुदाले या महिलेला उमेदवारी दिली असून, त्यांचे पॅनल मैदानात उतरले आहे. याशिवाय, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या मदतीने पलूस नगरपालिकेच्या सत्तेत राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पलूस नगरपालिका निवडणूक डॉ. कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

जत नगरपालिकेमध्येही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रयत्नांनी सत्ता टिकविण्याचा संघर्ष सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांची उमेदवारी दाखल झाली असून, पॅनल करताना महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शिराळा, आटपाडी नगरपंचायत, उरुण - ईश्वरपूर, विटा, तासगाव, आष्टा नगरपरिषदा निवडणुकीत काँग्रेसला नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत.

उरुण - ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील महाविकास आघाडीतील काँग्रेसला सोबत घेत असल्याचे सांगितले होते. परंतु, उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने काँग्रेसने उमेदवारी दाखल केली नाही. विटा येथे काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, निवडणुकीच्या अंतिम मुदतीच्या अगोदर भाजपची उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसशी दुरावा करून भाजपच्या उमेदवारीवर अर्ज भरला.

तासगावमध्ये काँग्रेसने माजी खासदार संजय पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे उमेदवार दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतलेले नाही. शिराळा व आटपाडीमध्ये काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे उमेदवारी मागणीतही फारसा उत्साह दाखवलेला नाही.

सहा पालिकांमध्ये मित्र पक्षांशी आघाडी : विक्रमसिंह सावंत

काँग्रेसने शिराळा, उरुण - ईश्वरपूर, विटा, तासगाव, आटपाडी व आष्टा या पालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली होती आणि एबी फॉर्मही तयार होता. मात्र, मतविभाजन होऊ नये, यासाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मतविभाजनाचा महायुतीला फायदा होऊ नये, हा एकमेव उद्देश असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Congress does not have an official candidate in six out of eight municipal council and nagar panchayat elections in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.