काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादीचे गटनेते भिडले; सांगली महापालिकेच्या महासभेत पाणीप्रश्नांवर जोरवार वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:30 IST2026-03-19T15:29:42+5:302026-03-19T15:30:15+5:30
एकमेकांच्या अंगावर धावले, माइक फेकण्याचा प्रयत्न, आंदोलनानंतर केलेल्या टिप्पणीमुळे ठिणगी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादीचे गटनेते भिडले; सांगली महापालिकेच्या महासभेत पाणीप्रश्नांवर जोरवार वाद
सांगली : शहरातील तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा महापालिकेच्या महासभेत बुधवारी चांगलाच पेटला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजेश नाईक आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यातील शाब्दिक चकमक थेट हातघाईपर्यंत पोहोचल्याने सभागृहात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सभेच्या प्रारंभीच काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी घागर घेऊन महापौरांच्या आसनासमोर ठिय्या देत पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. “शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना, प्रशासन काय करत आहे?” असा सवाल करत त्यांनी महापौरांना घेराव घातला. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पाणीप्रश्नावर लवकरच विशेष सभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला सदस्यांनी माघार घेतली.
मात्र, या आंदोलनावर राष्ट्रवादी (अजित पवार)चे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केलेल्या कथित हास्यास्पद टिप्पणीमुळे वातावरण पुन्हा तापले. ही टिप्पणी काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक यांना खटकली. “पाणीप्रश्नाची चेष्टा करू नका, हा गंभीर विषय आहे,” असे सुनावत त्यांनी बागवान यांना जाब विचारला.
यावरून दोन्ही नेते एकेरीवर आले. “खाली बसा” या शब्दांवरून वाद चिघळत गेला आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. काही क्षणांतच वातावरण चिघळून बागवान यांनी हातातील माइक उगारल्याचा प्रकार घडला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी धाव घेत दोघांना आवरले.
स्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच महापौर सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करत दोन्ही सदस्यांना शांत बसण्याचे आदेश दिले. “गैरसमज पसरवू नका, कुणीही चेष्टा केलेली नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी २३ मार्च रोजी पाणीप्रश्नावर विशेष सभा घेण्याची घोषणा केली. त्यानंतर वादावर पडदा पडला.
महिला सदस्यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा
नाईक-बागवान वादानंतर काँग्रेसच्या महिला नगरसेविकाही पुन्हा आक्रमक झाल्या. “महायुतीतील राष्ट्रवादीला पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही,” असा आरोप करत त्यांनी पुन्हा महापौरांच्या आसनासमोर जमाव केला. महापौरांनी समजूत काढत त्यांना शांत केले.