Sangli-ZP Election: पलूसमध्ये काँग्रेस-भाजप अशीच लढत होणार, कुंडल गटातील लढत लक्षवेधी ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:59 IST2026-01-14T18:59:03+5:302026-01-14T18:59:30+5:30
नितीन पाटील पलूस : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजल्याने नेते व इच्छुक उमेदवार रिचार्ज झाल्याचे पहायला मिळत ...

Sangli-ZP Election: पलूसमध्ये काँग्रेस-भाजप अशीच लढत होणार, कुंडल गटातील लढत लक्षवेधी ठरणार
नितीन पाटील
पलूस : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजल्याने नेते व इच्छुक उमेदवार रिचार्ज झाल्याचे पहायला मिळत आहे. पलूस तालुक्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुन्हा पारंपरिक लढत पहायला मिळणार आहे. महाआघाडी व महायुतीतच लढत पहायला मिळणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
बांबवडे, कुंडल राष्ट्रवादी अजित पवार गट वरचष्मा वगळता इतर ठिकाणी इतर पक्षांची ताकद नगण्य असल्याने युती व आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढली जाईल. पलूस तालुक्यात राजकारणाच्या नाड्या चार प्रमुख नेत्यांच्या हातात आहेत. काँग्रेसचे आमदार डाॅ. विश्वजित कदम यांच्याविरुद्ध भाजपमध्ये चित्र आहे. भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे प्रमुख नेते आहेत. यांचा त्रिकोण या निवडणुकीत तरी एकत्र येऊन एकदिलाने लढणार का हा मोठा प्रश्न आहे.
देशमुख बंधूमधील रुंदावलेली दरी अजूनही कमी झालेली नाही. तर शरद लाड यांची संग्राम लाड यांच्याशी वाढलेली जवळीक अनेक प्रश्नचिन्ह उभा करते. हे भाजपचे तीनही नेते एकदिलाने नांदले तरच एकास एक टक्कर होईल नाही तर ये रे माझ्या मागल्या... होत भाजपच पक्षाची ताकद दुभागून काँग्रेस याचा पुन्हा फायदा उठवणार का हे पहावे लागणार आहे.
तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रदीप कदम व निलेश येसुगडे यांचा गट काय भूमिका घेणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पलूस तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गण आहेत. कुंडल हा संवेदनशील गट असून इथे सर्वसाधारण लढत लक्षवेधी ठरणार आहे.
जिल्हा परिषद गट
- कुंडल गट : सर्वसाधारण
- अंकलखोप गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
- भिलवडी : सर्वसाधारण
- दुधोंडी गट सर्वसाधारण महिला
पंचायत समिती गण
- कुंडल बांबवडे : सर्वसाधारण महिला
- दुधोंडी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
- रामानंदनगर : सर्वसाधारण
- आमणापूर : सर्वसाधारण
- अंकलखोप : अनुसूचित जाती जमाती
- भिलवडी : नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग
- वसगडे : सर्वसाधारण महिला
पलूस तालुक्यातील या नेत्यांची मदत घ्यावीच लागेल
कुंडल : काँग्रेसचे महेंद्र लाड, भाजप शरद लाड, पोपट संकपाळ,
अंकलखोप : सतीश पाटील, घनशाम सूर्यवंशी, उदय पाटील, श्वेता बिरनाळे, भाजप सुरेंद्र चौगुले, राष्ट्रवादी अजित पवार, शरद पवार गटाचे नितीन नवले,
दुधोंडी : भाजप शिवाजी जाधव, काँग्रेसचे सुनील सावंत, गणपतराव सावंत, मीनाक्षी सावंत, जे.के. जाधव.
भिलवडी : काँग्रेस राजेंद्र पाटील, शहाजी गुरव, भाजप सुरेंद्र वाळवेकर, रमेश पाटील, श्रीकांत निकम, रोहित नलवडे तर मोहन तावदर यांचा पक्षाचा निर्णय गुलदस्त्यात आहे.